साडे चार वर्षांची प्रतीक्षा संपली, मतमोजणीची उत्सुकता शिगेला

20 Dec 2025 20:36:20
वर्धा, 
election-results : वर्धा जिल्ह्यातील सहा नगर पालिकांमध्ये आठ वर्षांंनंतर नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठी निवडणुका झाल्या. चार ते साडे चार वर्षांपासुन वर्धा, देवळी, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट आणि सिंदी रेल्वे येथे प्रशासकराज होते. २ डिसेंबर जिल्ह्यात देवळी नगरपालिका वगळता ५ नगर पालिकांमध्ये मतदान झाले होते. तर जिल्ह्यातील २७ उमेदवारांसाठी आज २० रोजी मतदान झाले. जिल्ह्यात ६ नगराध्यक्ष व १६६ नगरसेवकांच्या भाग्याचा उद्या रविवार २१ रोजी फैसला होणार आहे. कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे उद्या दुपारी १ वाजेपर्यंत जाहीर होईल. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये उमेदवारांनी देवदर्शन घेत देव आणि संतांच्या गळ्यात माळ घालत निवडून येण्याची प्रार्थना केली.
 
 
K
 
वर्धा जिल्ह्यातील ६ नगर पालिकांमध्ये ६ नगराध्यक्षपदासाठी ४३ तर १६६ नगरसेवकपदांसाठी ७८८ उमेदवार मैदानात होते. रविवारी सकाळी १० वाजता त्या त्या नगर पालिका क्षेत्रात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. बॅलेट पेपर नंतर ईव्हीएम मशीन उघडून मतमोजणी केली जाईल. सहा नगरपालिकांसाठी एकूण ५९ टेबलांवर ३६ फेर्‍यांत मतमोजणी होणार आहे. शनिवार, २० डिसेंबर रोजी देवळी पालिकेत नगराध्यक्षासह २० जागांसाठी, तर हिंगणघाट पालिकेत ३, वर्धा व पुलगाव पालिकेत प्रत्येकी २ सदस्यांच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आता अंतिम निकालाविषयी सर्वच उमेदवार व समर्थकांसह मतदारांची उत्कंठा शिगेला पोहोचली असुन उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धडधड वाढली आहे. निकालाच्या पृष्ठभूमीवर सर्व मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देवळी येथे नगरपालिका कार्यालय, वर्धेत जिल्हा क्रीडा संकुल सभागृह, हिंगणघाट येथे तहसील कार्यालय सभागृह, पुलगाव येथे नगरपालिका कार्यालय, आर्वी येथे—म्युनिसिपल हायस्कूल तर सिंदी-रेल्वे येथे नगरपालिका कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
 
 
जिल्ह्यातील सहा नगरपालिकांमध्ये राजकीय पक्षांसोबतच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. वर्धा अध्यक्षपदासाठी २, नगरसेवक ३१, हिंगणघाट अध्यक्ष ३, नगरसेवक ४०, आर्वी अध्यक्ष १, नगरसेवक ८, पुलगाव अध्यक्ष १, नगरसेवक ३४, देवळी अध्यक्ष २, नगरसेवक २२, सिंदी-रेल्वे नगरसेवक ७ असे सहा नगरपालिकांसाठी अध्यक्षपदांसाठी ९ तर नगरसेवकपदांसाठी १४२ असे एकूण १५१ अपक्ष उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.
 
 
नगर पालिकानिहाय टेबल व कर्मचारी
नगरपालिका -टेबल -कर्मचारी
 
वर्धा -१६ -८६
हिंगणघाट -१४ -११६
आर्वी -१३ -४२
पुलगाव -०६ -३२
देवळी -०४ - १४
सिंदी-रेल्वे -०६ -२५
.............................
एकूण -५९ -३१५
 ------------------------------------------------------
नगरपालिकानिहाय उमेदवारांची संख्या
नगरपालिका -अध्यक्ष -नगरसेवक
वर्धा -०८ -१९०
हिंगणघाट -१० -२२१
आर्वी -०६ -८६
पुलगाव -०८ -१२३
देवळी -०५ -७०
सिंदी रेल्वे -०६ -९८
..............................
एकूण -४३ -७८८
Powered By Sangraha 9.0