भंडारा,
dr ulhas phadke शिक्षणासह विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवून विविध संघटनांचे कार्य जिल्ह्यात वृद्धिंगत करण्यात मोलाचा वाटा उचलणारे राष. स्व. संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, महाराष्ट्र राज्य जल सिंचन आयोगाचे माजी सदस्य,भाजपा शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष डॉ. उल्हास फडके यांचे आज 20 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. डॉ. फडके हे लिहीत असलेल्या एका पुस्तकाच्या निमित्ताने यवतमाळ येथे गेले होते, तेथेच अंतिम श्वास घेतला.
भंडारा जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच जल सिंचन या क्षेत्रात प्रभावी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षक असलेल्या डॉक्टर उल्हास फडके यांनी अनेक वर्ष वरठी येथील नवप्रभात कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी केली. तेथूनच ते प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा स्थानावर अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळी सांभाळली. सध्या त्यांच्याकडे भाजपा शिक्षक सेल चे राज्य कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी होती.
शिक्षक आणि शिक्षणाच्या संबंधित असलेल्या समस्यांच्या संदर्भात कायमच ते झगडत राहिले. शिक्षणासोबतच जलसिंचन या विषयातही त्यांचा हातखंडा होता. महाराष्ट्र राज्याच्या जल सिंचन आयोगाचे सदस्य म्हणून डॉ. उल्हास फडके यांनी काम करताना शासनाला अनेक सकारात्मक बाबी सुचविल्या होत्या. गोड्या पाण्यातील मासेमारी या विषयावर त्यांचा शोध प्रबंध असून यासाठी त्यांना आचार्य पदवी ही बहाल करण्यात आली होती.
त्यांची शिक्षण आणि सिंचन या विषयावरील काही पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. सध्या ते "भारतीय अर्थशास्त्र आणि दीनदयाल उपाध्याय" या विषयावर पुस्तकाचे लेखन करीत होते. याच पुस्तकाच्या लिखाण कामाच्या निमित्ताने ते मागील आठ दिवसांपासून यवतमाळला होते. आज झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले.dr ulhas phadke दुपारी त्यांचे पार्थिव भंडारा येथे आणण्यात आले असून उद्या 21 रोजी सकाळी 10 वाजता पार्थिवावर भंडारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने राजकीय, शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची खंत मान्यवरांनी व्यक्त केली.