अकोला,
जिल्ह्यातील तेल्हारा, आकोट, हिवरखेड व मुर्तीजापुर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या उमेदवाराने दणदणीत विजय मिळवला असून बार्शीटाकळी नगरपंचायतमध्ये वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडली तर बाळापुर नगरपरिषदेमध्ये काँग्रेसने आपला गड कायम ठेवला. पाच नगरपरिषद व एका नगरपंचायत करिता रविवार, २१ रोजी मतमोजणी पार पडली.या निवडणूकीत सहा नगराध्यक्ष पदासाठी ३८ तर १४२ नगरसेवकांच्या जागेसाठी ६७५ उमेदवार रिंगणात होते. निकालात भाजपाची सरशी पाहायला मिळाली असून तेल्हारा, अकोट मुर्तीजापुर हे आपले गड भाजपने कायम ठेवले असून नव्याने निर्माण झालेल्या हिवरखेड नगरपरिषदेवर देखील भाजपची सत्ता आली.या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची झालेली सभा यशस्वी झाल्याचे या ऐतिहासिक विजयातून स्पष्ट होते. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तेल्हारा- वैशाली पालिवाल (भाजपा), आकोट-माया धुळे (भाजप), हिवरखेड -सुलभा दुतोंडे (भाजपा), मूर्तिजापूर- हर्षल साबळे (भाजप), बार्शीटाकळी-अख्तरा खातून अलीमोद्दीन- (वंचित आघाडी), बाळापूर-डॉ अफरिन परवीन (काँग्रेस) यांचा विजय झाला.