सिंदी (रेल्वे),
municipal-council-election-results-sindi : स्थानिक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अटितटीच्या लढाईत अंतिम फेरीत भाजपाच्या राणी कलोडे यांनी ११०० मतांनी विजय पटकावला. यावेळी अनेक अपक्ष किंवा बंडखोरांनी अनेकांचे गणित बिघडवल्याचे लक्षात आले आहे. प्रभाग ७ मधून बोरकर बहीण भाऊ विजयी झाले, हे विशेष!
आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अपेक्षेनुसार प्रथम समस्त नगरसेवकपदांसाठी झालेल्या प्रभागवार निकाल जाहीर करण्यात आले. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राणी कलोडे यांनी ११०० मतांनी शरद पवार गटाच्या सुनीता कलोडे यांचा पराभव केल्याची घोषणा निवडणूक व निर्णय अधिकारी बबिता आळंदे यांनी केली.
प्रभाग १ मधून भाजपाचे सुधाकर वल्के आणि जयश्री मडावी विजयी झाले. प्रभाग २ मधून भाजपाच्या चेतना बडवाईक आणि शरद तळवेकर विजयी ठरले. ३ मधून भाजपाचे प्रवीण मडावी व राजश्री बोरीकर यांनी सहज विजय प्राप्त केला. प्रभाग ४ मध्ये कांग्रेसचे सूरज कोपरकर व अपक्ष ममता बोंगाडे यांनी बाजी मारली. प्रभाग ५ मध्ये झालेल्या तीव्र संघर्षात काँग्रेसचे अजय रामदास कलोडे तथा दुर्गा बेलखोडे यांनी विजय मिळवला. येथून अशोक सातपुते सातव्यांदा भाग्य आजमावत पराभूत झाले.
प्रभाग ६ मध्ये दोन्ही जागांसाठी तुल्यबळ लढत झाली. त्यात तुषार हिंगणेकर आणि जोत्सना तडस विजयी झाले. प्रभाग ७ मधून शरद पवार गटाचे जगदीश बोरकर तर भाजपाच्या ऐश्वर्या गवळी यांनी आपल्या विरोधकांना धूळ चारली. ऐश्वर्या आणि जगदीश बहिण भाऊ आहेत. प्रभाग ८ कडे मान्यवरांचा रंगतदार संघर्ष अपेक्षित होता! तेथून शरद पवार गटाचे आशिष देवतळे (माजी नगरसेवक) आणि भाजपाच्या योगीता जांबूतकर यांनी विजय संपादित केला. प्रभाग ९ मधून भाजपाचे घनश्याम मेंढे, शरद पवार गटाच्या वर्षा बोंबले विजयी झाले. प्रभाग १० मध्ये अकरा उमेदवार रिंगणात होते. तेथून भाजपाचे अकील शेख(माजी नगरसेवक) आणि त्याच पक्षाच्या इंदू कस्तुरे विजयी झाल्या. सर्व विजयी उमेदवारांनी पेढे वाटून गुलाल उधळत ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढली.