नाशिक,
chhagan-bhujbals-in-yeola महाराष्ट्रात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून, राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. २ आणि २० डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होत आहे. यंदा राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील २४६ नगरपरिषदांसाठी निवडणुका पार पडल्या असून, सुरुवातीच्या निकालांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्यात विशेष लक्ष वेधून घेतले ते येवला नगरपरिषदेचे निकाल. येवला हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या निवडणुकीत भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नाशिक जिल्ह्यातील येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, भगूर, इगतपुरी आणि मनमाड या सहा नगरपरिषदांच्या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. येवला नगरपरिषदेतील लढतीत अजित पवार गटाला विजय मिळवून देण्यासाठी स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी नेतृत्व केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा युतीचे उमेदवार राजेंद्र लोणारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रूपेश दराडे यांचा सुमारे १,१०० मतांनी पराभव केला. chhagan-bhujbals-in-yeola या विजयासह येवल्यात महायुतीचा झेंडा फडकला असून, भुजबळांचा गड कायम राहिला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आजारी होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि ते रुग्णालयात दाखल होते. प्रकृती ठीक नसतानाही भुजबळ यांनी निवडणुकीची सूत्रे हातात ठेवली. प्रत्यक्ष प्रचाराला जाता न आल्यामुळे त्यांनी रुग्णालयातूनच रणनीती आखत प्रचार आणि राजकीय निर्णयांवर लक्ष केंद्रित केले. भुजबळ यांच्या आजारपणाच्या काळात समीर भुजबळ यांनी प्रचाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. भुजबळ कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. chhagan-bhujbals-in-yeola स्वतः छगन भुजबळ यांनीही रुग्णालयातून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आणि नेत्यांना मार्गदर्शन करत लढत जिंकण्यासाठी प्रयत्न केले. अखेर त्याचे फलित येवल्यातील विजयाच्या रूपाने समोर आले.
या निवडणुकीदरम्यान येवल्यात राजकीय घडामोडींना वेग आला होता. महायुतीमध्येच मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली. भुजबळ कुटुंबाने आपली संपूर्ण ताकद आणि राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लावली होती. निवडणुकीच्या काळात छगन भुजबळ यांनी रुग्णालयातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. भाजपाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे भुजबळांना अतिरिक्त बळ मिळाले. दरम्यान, शिंदे गटातील नरेंद्र दराडे आणि किशोर दराडे यांनी भुजबळांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचाही अप्रत्यक्ष पाठिंबा मिळाला. मात्र, सर्व राजकीय गणिते बाजूला सारत छगन भुजबळ यांनी येवल्यात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आणि नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला विजय मिळवून दिला.