रोखठोक. . .
दिनेश गुणे
clean india campaign अलिकडे समाज माध्यमांवर एक विनोद वेगाने फैलावला आहे. ‘स्वच्छ भारत मोहीम महाराष्ट्रात शंभर टक्के यशस्वी होणार आणि राज्यात स्वैरपणे वावरणाऱ्या बिबट्यांचा त्या यशामध्ये सिंहाचा वाटा असणार’ असा हा विनोद खरे म्हणजे अस्वस्थ करणारा, विरोधाभासावर बोट ठेवणारा म्हणावा लागेल. पण या निमित्ताने, स्वच्छ भारत मोहीम नावाचे एक राष्ट्रीय जनआंदोलन पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेत आले, याची खात्री पटते.

विरंगुळ्यासाठी असे काही समाजमाध्यमी साहित्य पचवून झाले की आपण आपल्या उद्योगाकडे वळतो. काहीच काम नसेल, तर जुने काहीतरी वाचत, ऐकत किंवा न्याहाळत बसतो. परवा माझेही तसेच झाले. काशी विश्वेश्वरधाम प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधानांचे एक जुने भाषण ऐकत मी घराच्या खिडकीत बसलो होतो आणि त्यांच्या भाषणातही स्वच्छ भारत मोहिमेचा तो उल्लेख ऐकला. पंतप्रधानांनी एखादी मोहीम सुरू केली की त्याचा सातत्याने पाठपुरावा करून समाजास सातत्याने त्याची आठवण करून देण्याची त्यांची सवय एव्हाना देशाला माहीत झाली आहे. त्या भाषणात स्वच्छ भारत मोहिमेचा उल्लेख पुन्हा ऐकला, तेव्हा मी खिडकीतून बाहेरचा परिसर निरुद्देशपणे न्याहाळत होतो...
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर एक नाला आहे. कधीकाळी ती नदी, खाडी असावी एवढे ऐसपैस पात्र आहे त्याचे. खूप वर्षांपूर्वी आम्ही या घरात राहायला आलो, तेव्हा ती वाहती नदीच होती. थंडीच्या दिवसांत पहाटे त्या पात्रातील पाण्यावर वाफांची वर्तुळे नृत्य करायची आणि काठावर ध्यान करून बसलेले बगळे अचानक पाण्यात चोची बुडवून एखादा मासा गट्टम करायची. सकाळी उठून खिडकीबाहेर पाहिल्यावर दिसणाऱ्या या दृश्याला भुलून आम्ही हे घर घेतलं, तेव्हा भविष्याची जरादेखील शंका मनात डोकावली नव्हती. आता त्या नाल्यातून रसायनमिश्रित काळे पाणी वाहते. आता काठावर बगळे नाहीत, कावळे कलकलाट करत असतात. भरतीची वेळ सोडली, तर त्या नाल्यातलं ते प्रदूषित रसायन एकाच जागी संथ साचल्यागत स्वस्थ असतं. कधीतरी एखादा डंपर येतो आणि त्या काळ्या पाण्यात ट्रकभर कचरा ओतला जातो. कुणीतरी रस्त्यावरून जाता जाता पुलावर थांबून कचरा किंवा टाकाऊ वस्तूंनी भरलेली प्लॅस्टिकची पिशवी फेकतं. त्या संथ साचलेपणात थोडीशी खळबळ माजते. काही क्षण नाला ढवळला जातो आणि पुन्हा साचलेलं काळं पाणी संथ होऊ लागतं. कचरा आणि टाकाऊ वस्तूंचे ढिगारे माजले की, ते काळं पाणी संकोचून काठाकडचा कोपèयात जमा होऊ लागतं, तोवर पावसाळ्याची चाहूल सुरू होते. मग महापालिका नालेसफाई वगैरे कार्यक्रम हाती घेते आणि मोठमोठी पोकलेनसारखी यंत्रे काठावर धडधडू लागता. काळं पाणी ढवळून निघतं. आधी टाकलेला कचरा उचलण्याचा कार्यक्रम घाईघाईने पार पाडून गाड्या निघून जातात आणि काळं पाणी उरलेला कचरा कवटाळत पुन्हा जागच्या जागी साचून स्वस्थ बसतं.
पंतप्रधानांच्या भाषणातील स्वच्छ भारत मोहिमेचा उल्लेख कानावर पडला, तेव्हा मी किड्यांच्या वळवळण्यामुळे अस्वस्थ झालेल्या त्या काळ्या डबक्याकडे पाहात होतो. मला अलिकडे ते पाहताना आनंद वगैरे होत नाही. आता तो नाला पुन्हा पहिलेसारखा नदी होऊन नितळ पाण्याने वाहू लागणार नाही, याची मला पुरती खात्री असल्याने, नाल्याचे वास्तव मी मान्य केले आहे. नदीचा नाला होऊन पाण्याची जागा रसायनमिश्रित द्रवपदार्थांनी घेतली हा त्या नाल्याचा नव्हे, तर माणसाचाच दोष आहे, हे माहीत असूनही आपल्याला लाज का वाटली नाही असा विचारही मनात आला. त्याच वेळी स्वच्छ भारत मोहिमेचे काहीसे हसू देखील आले. स्वच्छता हा कोट्यवधी रुपये खर्चाचा सरकारी कार्यक्रम करावा लागतो, हा मानसिक विकासाच्या अनुशेषाचाच परिणाम आहे, हेही जाणवले आणि विचार करत करत मन मागे गेले.
पंतप्रधानांचं भाषण ऐकत असतानाच खिडकीतून पुन्हा माझी नजर त्या नाल्यात साचलेल्या काळ्या पाण्यावर पडली. आता पाण्याचे कोणतेच गुण त्याच्या अंगी राहिलेले नाहीत. त्यामध्ये मासा शोधूनही सापडणार नाही, पण त्याच्या तेलकट तवंगावर किडे वळवळताना दिसतात. उन्हाची किरणं त्या तवंगावर पडली की वळवळणाèया किड्यांच्या हालचालींनी नाला अस्वस्थ चुळबुळताना दिसतो. कदाचित त्यातल्या रसायनालादेखील एकाच जागी साचल्याचा कंटाळा येत असावा...
मुंबईच्या मध्यावरून मिठी नदी वाहते. तिला अजूनही नदी म्हणत असले, तरी तो आता असाच एक नाला आहे. रसायनमिश्रित द्रवपदार्थ, कचरा आणि टाकाऊ म्हणून नकोसे झालेल्या असंख्य वस्तू पोटात घेणारे ते हक्काचे ठिकाण झाले आहे. काही वर्षांपूर्वी, मुंबईत वाझे नावाच्या पोलिस अधिकाèयावर खंडणी वसुली प्रकरणी कारवाई सुरू झाल्यावर तर, या मिठीच्या पोटातून संगणक आणि महत्त्वाची माहिती असलेल्या हार्ड डिस्कस् देखील बाहेर काढल्या गेल्या होत्या. असंख्य गुन्ह्यांचे पुरावेदेखील या नाल्याच्या पोटात गडप झाले असल्याची वदंता आहे. तरीही पश्चिम उपनगरांतील अनेक जण उपनगरी गाड्यांतून ये-जा करताना सोबतच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणलेले निर्माल्य, नारळ, पूजेचे साहित्य वगैरे वस्तू गाडी पुलावर आली की भक्तिभावाने मिठी नदीत फेकतात आणि नमस्कारही करतात. हेही मानसिकतेचेच एक रूप असते.
ते भाषण ऐकताना, स्वच्छ भारताच्या मुद्यापाठोपाठ मनात साचलेली ही काही दृश्ये जिवंत झाली आणि स्वच्छता हे मानसिक विकासाचे पहिले लक्षण आहे, असा निष्कर्ष मी काढला. आजकाल मुंबईत स्वच्छता राखण्यासाठी, रस्त्याकडेच्या भिंतींवर देवतांच्या वगैरे प्रतिमा रंगविल्या जातात. देवादिकांचे फोटोही लावले जातात. त्यांच्यासमोर कचरा वगैरे फेकण्याएवढा बेमुर्वतपणा माणसाच्या अंगी सरसकटपणे नसतो, असा त्यामागचा विचार असावा. पण स्वच्छतेचे महत्त्व सांगणाèया एखाद्या होर्डिंर्ंगच्या खालीच कचरापट्टी झालेलीही इथे पाहायला मिळते. मानसिक विकासाचा अनुशेष भरून काढायला आपल्याला किती वर्षे लागणार, या विचाराने मनात काहूर माजते. पंतप्रधान मात्र, आपल्या प्रत्येक भाषणात स्वच्छ भारताचा मंत्र देतच असतात...
अकरा वर्षांपूर्वी, 2 ऑक्टोबर 2014 रोजी गांधी जयंतीदिनी स्वच्छ भारत नारा देशभरात घुमला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: झाडू हातात घेऊन राजघाटावर स्वच्छता करत या मोहिमेची सुरुवात केली आणि देशातील चार हजार शहरांमध्ये रस्ते, नद्या आणि परिसराच्या स्वच्छतेचा संकल्प सोडला गेला. राष्ट्रीय पातळीवर ही मोहीम राबविण्यासाठी देशातील 30 लाख सरकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी होतील आणि 2019 मध्ये महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीदिनी स्वच्छ भारताची त्यांची इच्छा पूर्ण केली जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी त्या दिवशी व्यक्त केला. यापुढे या देशात कोणीही कचरा करणार नाही आणि कोणीही कोणासही कचरा करू देणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आणि देशातील प्रत्येक नागरिकाने या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होऊन देश स्वच्छ राखावा, असे आवाहनही केले...
आता या मोहिमेने जनआंदोलनाचे रूप घेतले आहे, स्वच्छ भारत हा नारा देशाच्या नव्हे, जगाच्या कानाकोपèयात पोहोचला आहे आणि या मोहिमेच्या यशाकडे उभे जग उत्सुकतेने पाहात आहे, असे म्हटले जाते. म्हणूनच, दहा-अकरा वर्षांनंतर आसपास पाहताना सहज दिसणाèया काही बाबी नोंद करून ठेवाव्या असे वाटले...
स्वच्छता हे देवाचे दुसरे नाव आहे असा संदेश मिरवत यच्चयावत देवप्रतिमांपासून साईबाबांपर्यंत सारे रस्तोरस्तीच्या भिंतींवर वर्षानुवर्षे असूनही, अस्वच्छतेचा कलंक माथी मिरविण्याची सवय संपली नव्हती, ती या एका नाèयाने नष्ट होईल यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती अजूनही निर्माण झालेली नाही. पंतप्रधानांनी ज्या विश्वासाने देशातील जनतेच्या खांद्यावर स्वच्छतेच्या जबाबदारीची पालखी सोपविली, ती पेलण्यासाठी अजूनही जनतेचे खांदे पुरेसे सक्षम झालेले नसावेत असे वाटण्याजोगी स्थिती आजही जागोजागी अनुभवास येते. आसपासच्या सहज जाणवणाऱ्या एखाद्या प्रसंगातून ही खंत उगीचच डोके वर काढू लागते.
कालच, एका शेअर रिक्षाने प्रवास करतानाच्या एका प्रसंगामुळे असं वाटायला लागलं. धूर, गाड्यांचे कर्कश हॉर्न, गर्दीचा सरमिसळलेला आवाज आणि प्रचंड वाहतूक कोंडीच्या पसाऱ्यातून कशीबशी वाट काढत आमची रिक्षा एका सिग्नलजवळ थांबली. रिक्षाचालकाने इकडेतिकडे पाहिले आणि गुटखा, मावा किंवा तंबाखूचा तोबरा भरून तोंडाचे तळे होईपर्यंत साठविलेली थुंकीची पिंक रस्त्यावर मोकळी करून ढणाढण वाजणाऱ्या गाण्याच्या सुरात त्याने आपलाही सूर मिसळला. पुढचा सिग्नल येईपर्यंत पुन्हा त्याचे तोंड भरले होते. या सिग्नलला थांबताच तो पुन्हा पचकन थुंकला. एक गिळगिळीत शहारा अंगावर आल्याने न राहवून मी त्या रिक्षावाल्याला सुनावू लागलो. बाजूचे दोन सहप्रवासीही साथीला आले.clean india campaign पण त्याचा काहीच परिणाम झाला नव्हता. एवढे ऐकल्यानंतरही, काही फरक पडल्याची एकही रेषा रिक्षावाल्याच्या चेहèयावर उमटली नव्हती.
‘‘भैया, जिस रस्तेपर गाडी चलाके रोजीरोटी कमाते हो, उसीपर थूकते हुए शरम नहीं लगती क्या?’’ शेजारच्या प्रवाशाने तळमळून प्रश्न केला आणि रिक्षावाल्याने मागे वळून पाहिले. तोच थंडपणा त्याच्या चेहऱ्यावर होता.
‘‘देखो साब, मेरी रोजीरोटी इस रिक्षा से चलती है... रस्तेपरसे नहीं और रही बात, शरम लगनेकी... मुझे बताईये, रस्तेपर थूकनेवाला मैं अकेलाही हूँ क्या?... तो मेरे ना थूकनेसे क्या आपको लगता है कि मुंबई साफ रहेगी?... मैं तो थुकूंगा. और एक बात. मैं पूरा दिन रस्तेपर ही गाडी चलाता रहता हू... बीच में कभी पेशाब के लिए रुकना तो पडता है ना?... लेकिन अगर जगहजगह पर पेशाबघर हैही नहीं, तो क्या मैं ऐसेही, किसी रस्ते के बाजू में खडा होकर पेशाब नहीं करूंगा?... इससे भी तो गंदगी होती है. क्या उस गंदगी के लिए आप मुझे जिम्मेदार ठहराओगे या सिस्टमको?’’
...उत्तराची वाट न पाहता रिक्षावाला समोर बघू लागला. सिग्नल पडला आणि पुन्हा एकदा रस्त्यावर पचकन थुंकून त्याने गाडी दामटली!
एका जुन्या पावसाळी दिवशी, मुंबईच्या रस्त्यावरून प्रवास करताना आलेला असाच एक अनुभव... ‘बेस्ट’ची एक खच्चून भरलेली बस. पुरुष प्रवासी पॅसेजमधेही उभे आहेत. महिलांसाठी राखीव बाकडी मात्र, एका महिला प्रवाशासाठी पूर्ण बाकडे अशा हिशेबाने भरलेले! लक्षपूर्वक ध्यान दिले, तर जवळपास प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर, पुरुष प्रवाशांना खुन्नस दिल्याचा भाव दिसतोय! अचानक पावसाची सणसणीत सर आल्याने खिडक्यांच्या काटा फटाफट खाली ओढल्या जातात आणि पावसामुळे ट्रॅफिकही जाम होते. कितीतरी वेळ गाडी जागेवरच उभी होती! दोन-चार मिनिटांत उकाड्याने गर्दी कासावीस होऊ लागते. घामाच्या धारा सुरू होतात. अशा वेळी अस्वस्थता येते. चिडचिड होते. गर्दीतल्या कुणाचा स्पर्शही नकोसा वाटू लागतो आणि आपण असे हाल सोसत असताना दुसरं कुणी मात्र आराम एन्जॉय करतोय हे पाहणे तर आणखीनच बेचैन करणारे असते! अशाच वातावरणात, महिलांसाठी राखीव असलेल्या एका बाकड्यावर ऐसपैस बसलेल्या एका प्रवासी महिलेने पर्स उघडली. कंगवा काढला. केस मोकळे करून मनसोक्त मान हलवली. एखाद्या मोराने पिसारा फुलवून थिरकवावा, तसे आपले केस मान हलवूनच फुलविले आणि भरलेल्या बसमध्ये, स्वमग्नपणे, आत्मानंदी टाळी लागल्याच्या पारमार्थिक आनंदात, केस विंचरण्याचा सोहळा सुरू झाला... केसातून फिरणारा कंगवा बाहेर आला की त्यात अडकलेली गुंतवळ बोटाने सोडवून केसांना अलगदपणे बसमध्येच सीटखाली सोडणे सुरू झाले. केसांची गुंतवळ एकत्र केली तर बचकाभर तरी होईल, असे ते ऐतिहासिक दृश्य पाहणाऱ्या प्रत्येक प्रवाशास वाटत असावे, हे त्यांच्या मळमळलेल्या चेहऱ्यांवरच दिसत होते. ती महिला मात्र, आसपासची तमा न करता, बसला कचराकुंडी समजून केसांची गुंतवळ अर्पण करतच होती.
.... वाहतूक कोंडीत खोळंबून थांबलेल्या बसमधूनच रस्त्याकडेच्या एका भिंतीवर स्वच्छ भारतच्या जाहीरातीचे भलेमोठे पोस्टर दिसत होते. त्यावर मोदींचं चित्र पाहून एक प्रवासी उखडला.
‘‘ये अकेला आदमी क्या घंटा करेगा स्वच्छ भारत?’’ तो जोरात बोलला.
गर्दीकडे लक्षही न देता आत्मग्नपणे केस विंचरणाऱ्या त्या महिलेने कंगव्यातला अखेरचा पुंजका सीटखाली सोडला आणि केस पुन्हा बांधून ती नीटनेटकी झाली! स्वच्छ!!
...पण अजूनही या मोहिमेच्या यशाची आशा संपलेली नाही. स्वच्छता हे देवाचे दुसरे नाव आहे, हा सुविचार एव्हाना मुंबईसारख्या महानगरातील रस्त्यारस्त्यावर दिसूही लागला आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येकास तो पाठ झाला आहे आणि मोदी नावाच्या माणसाने देशात राष्ट्रीय स्तरावर स्वच्छतेची मोहीम सुरू करून महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्याचा ध्यास अजूनही सोडलेला नाही, हेही अनेकांस माहीत आहे. कदाचित म्हणूनच, एखादा टाकाऊ कागद, प्लॅस्टिक, बाटली वगैरे वस्तू वापर संपताच लगेचच फेकून देण्याआधी लोक हळूच इकडेतिकडे पाहातात, असे लक्षात येते. आपल्याला कुणी पाहात नाहीये ना, याची खात्री झाल्यावर मगच या वस्तू इतस्तत: फेकाव्यात एवढी समज निर्माण झाली आहे... याचा अर्थ, पहिलेसारखा बेदरकारपणा आता अशा कृतीत फारसा दिसत नाही.
एवढ्या बदलास दहा वर्षे लागली असा हिशेब केला, तर वाटेल तेथे फेकून कचरा माजवू नये हा संपूर्ण विचार मनात रुजण्यासाठी पुढची पंचवीस वर्षे तरी लागतील, असा अंदाज आहे. तसेही, उत्क्रांती ही संथपणे पुढे सरकणारीच प्रक्रिया आहे.
माणसाला पूर्वी शेपूट होते असे म्हणतात. ते नष्ट व्हायला हजारो वर्षांची वाट पाहावी लागली होतीच की!