वॉशिंग्टन,
Islamism is a threat to American freedom अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक तुलसी गबार्ड यांनी इस्लामिक विचारसरणीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील AMFest अर्थात अमेरिका फेस्ट या कार्यक्रमात बोलताना त्यांनी इस्लामवादावर तीव्र शब्दांत टीका करत तो अमेरिकेच्या स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचा दावा केला. गबार्ड यांनी इस्लामवादाची व्याख्या धर्म म्हणून न करता एक राजकीय विचारसरणी म्हणून केली. ही विचारसरणी वैयक्तिक स्वातंत्र्य, खासगी आयुष्य आणि लोकशाही तत्त्वांना नाकारते, असे त्यांनी स्पष्ट केले. या विचारसरणीचा अंतिम उद्देश जागतिक खलिफा आणि शरिया कायद्यावर आधारित शासन स्थापन करणे हा असल्याचे त्यांनी म्हटले. हा धोका केवळ परकीय देशांपुरता मर्यादित नसून तो आता अमेरिकेच्या आतही पसरत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आपल्या भाषणात त्यांनी युरोपमधील परिस्थितीचे उदाहरण दिले. नाताळच्या पार्श्वभूमीवर जर्मनीसारख्या देशांमध्ये ख्रिसमस मार्केट रद्द करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आणि या घटनांचा संबंध इस्लामिक कट्टरतेशी जोडला. इस्लामवाद ही राजकीय विचारसरणी असून त्यात वैयक्तिक स्वातंत्र्यास स्थान नसते, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. तुलसी गबार्ड यांनी पुढे सांगितले की अमेरिकेने वेळीच या धोक्याची दखल घेतली नाही, तर युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली, तशीच स्थिती अमेरिकेतही उद्भवू शकते. काही अमेरिकी शहरांमध्ये कट्टरपंथी इस्लामिक धर्मगुरू उघडपणे तरुणांना भडकवत असून त्यांना दहशतवादी विचारसरणीकडे ढकलत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या संदर्भात त्यांनी डिअरबॉर्न (मिशिगन), मिनियापोलीस (मिनेसोटा), पॅटरसन (न्यू जर्सी) आणि ह्युस्टन (टेक्सास) या भागांचा उल्लेख केला. या ठिकाणी काही इस्लामिक धर्मगुरू उघडपणे कट्टर विचारांचा प्रचार करत असून तरुणांची भरती करत असल्याचा दावा त्यांनी केला. न्यू जर्सीतील पॅटरसन शहराबाबत बोलताना त्यांनी, हे शहर पहिले ‘मुस्लीम शहर’ असल्याचा अभिमान व्यक्त करत असल्याचे सांगितले आणि तिथे कायदे किंवा हिंसाचाराच्या माध्यमातून इस्लामिक तत्त्वे लादली जात असल्याचा आरोप केला. दरम्यान, आपल्या वक्तव्यावर होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर तुलसी गबार्ड यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की त्यांची टीका धर्म म्हणून इस्लाम किंवा मुस्लिम समाजाविरुद्ध नाही. त्यांचा रोख हा राजकीय इस्लाम आणि दहशतवादाविरुद्ध असून लोकशाही आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठीच हा इशारा दिला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.