चंद्रपूर जिल्ह्यात 7 नगरपालिकांवर काँग्रेसचे वर्चस्व

21 Dec 2025 20:29:22
चंद्रपूर, 
municipal-council-election-results-chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका व एका नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक 7 नगरपालिकांमध्ये काँगे्रसने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. काँगे्रसच्या या जोरदार मुसंडीने भाजपाला केवळ एक नगरपालिका व नगरपंचायतीतच आपले वर्चस्व राखता आले. तर भद्रावतीत शिवसेना आणि गडचांदुरात अपक्षाने बाजी मारली.
 
 
 
cong
 
 
 
वरोड्याच्या अध्यक्षपदावर काँग्रेसने आपला दावा सिध्द केला. काँग्रेसच्या अर्चना ठाकरे यांनी भाजपच्या माया राजुरकर यांचा पराभव केला. तर भाजपाने चिमूर नगर परिषदेचा गड कायम राखला आहे. तेथे भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गिता लिंगायत यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नंदेश्वर यांचा पराभव केला. घुग्घूस नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक असून, काँग्रेसने त्यावर आपले वर्चस्व सिध्द केले. येथे काँग्रेसच्या उमेदवार दीप्ती सोनटक्के यांनी भाजपच्या शारदा दुर्गम यांचा पराभव केला. ब्रम्हपुरीत काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार योगेश मिसार यांचा प्रचंंड मताधिक्क्यांनी विजय झाला. तेथे नगरसेवकपदाच्या 23 पैकी 21 जागा जिंकून काँग्रेसने विक्रम केला.
 
 
भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसचा पराभव केला. शिवसेनेचे प्रफुल चटकी यांनी काँग्रेस-वंचितचे उमेदवार सुनील नामोजवार यांचा पराभव केला. प्रफुल चटकी यांना 10 हजार 304 मते, तर सुनील नामोजवार यांना 9 हजार 475 मते मिळाली. भाजपाचे अनिल धानोरकर तिसर्‍या क्रमांकावर राहिले. मूल नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा दारुण पराभव केला. काँग्रेसने भाजपाची येथील दहा वर्षाची सत्ता उलथवून टाकली. काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार एकता समर्थ या विजयी झाल्या असून, त्यांनी भाजपाच्या प्रा. डॉ. किरण कापगते यांचा पराभव केला. काँग्रेसने 20 पैकी 18 जागांवर विजय मिळविला. तर, भाजपाला केवळ 2 जागा जिंकता आल्या.
 
 
राजुरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्या नगर विकास आघाडीने स्पष्ट वर्चस्व मिळवत नगरपरिषद ताब्यात घेतली. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत या आघाडीचे उमेदवार अरुण धोटे यांनी भाजपाचे उमेदवार राधेश्याम अडाणीया यांचा पराभव केला. 2001, 2016 आणि आता 2025 असे तीनवेळा जनतेमधून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा मान अरुण धोटे यांनी मिळविला.
 
 
बल्लारपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अलका वाढई यांनी अध्यक्षपद जिंकले. त्यांनी 14 हजार 616 मते मिळवत भाजपाच्या उमेदवार रेणुका दुधे यांचा पराभव केला. ही लढाई अटीतटीची राहिली. अलका वाढई या केवळ 217 मतांनी विजयी झाल्या. तसेच शिवसेना (उबाठा) च्या उमेदवार चैताली मुलचंदानी या तिसर्‍या क्रमांकावर राहिल्या. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 17, भाजपाने 7, शिवसेना (उबाठा) 5, राकाँ (अजित पवार गट) 3, शिवसेना एक आणि एक अपक्ष नगरसेवकाने विजय मिळवला.
भिसी नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुल पारवे यांनी अपक्ष उमेदवार विक्की कटारे यांचा पराभव केला. नागभीड नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा पराभव केला. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार स्मिता खापर्डे विजयी झाल्या.त्यांनी भाजपाचे प्रा. लोमेश दुधे यांचा पराभव केला. गडचांदूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी श्रीतेज फाउंडेशन व शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार निलेश ताजने यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सचिन भोयर यांचा पराभव केला.
Powered By Sangraha 9.0