भाजपा-शिंदे गटाला धक्का; औसामध्ये राष्ट्रवादीची सत्ता

21 Dec 2025 13:12:23
लातूर,
rashtravadi in power in Ausam लातूर जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या औसा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी बाजी मारली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार परवीन शेख यांनी तब्बल 600 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत औसामध्ये सत्ता स्थापन केली आहे. या निकालानंतर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि गुलाल उधळत जल्लोष साजरा केला.
 
 

अजित पवार गटाचे वर्चस्व 
हा निकाल भाजपासाठी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. औसा नगरपरिषद निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट युतीने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक प्रचारासमोर ही युती अपयशी ठरली. आजी-माजी आमदारांची साथ असूनही भाजपाला औसामध्ये अपेक्षित यश मिळवता आले नाही, ही बाब सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.
 
 
औसा नगरपरिषदेच्या एकूण 23 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. यामध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तब्बल 17 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे भाजप–शिंदे गट युतीला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्ष पदासह बहुसंख्य जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवल्याने आता औसा नगरपरिषदेवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले आहे.अभिमन्यू पवार हे 2019 पासून औसा मतदारसंघाचे आमदार असून, याआधी दोन वेळा आमदार राहिलेले बसवराज पाटील यांनीही 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे चित्र होते. मात्र, स्थानिक मतदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसलाच कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
Powered By Sangraha 9.0