नवी दिल्ली,
Gavaskar's witty remark on Gill आगामी टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने शनिवारी भारतीय संघाची घोषणा केली आणि या निवडीतून उगवता तारा शुभमन गिल याला वगळण्यात आल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. ट्वेन्टी-20 विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने शुभमन गिलला मोठा धक्का बसला असून त्याच्या जागी ईशान किशनला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे. तसेच अक्षर पटेलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. गेल्या काही काळात टी-20 फॉर्मेटमध्ये शुभमन गिलकडून अपेक्षित कामगिरी झाली नसली, तरी टेस्ट आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आणि ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिलला थेट वगळण्यात येईल, अशी अपेक्षा फार कमी जणांना होती. त्यामुळे हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गावस्कर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की शुभमन गिलची निवड न होणे हे अनपेक्षित होते. असा निर्णय घेतला जाईल, असे कुणालाच वाटले नव्हते, असेही त्यांनी मान्य केले. शुभमन गिल हा दर्जेदार आणि तंत्रशुद्ध फलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो धावांसाठी झगडताना दिसला, मात्र फॉर्म हा कायमस्वरूपी नसतो, तर खेळाडूचा क्लास महत्त्वाचा असतो, असे गावस्कर यांनी नमूद केले. गावस्कर यांच्या मते शुभमन गिल मूळचा कसोटी क्रिकेटचा खेळाडू आहे. जमिनीलगत खेळले जाणारे त्याचे फटके, त्याचे संयमित तंत्र हे टेस्ट क्रिकेटला अधिक साजेसे आहे. टी-20 फॉर्मेटमध्ये ज्या पद्धतीने आक्रमक फटके मारावे लागतात, त्यात त्याला काही अडचणी येत आहेत. मात्र तरीही तो एक उत्तम फलंदाज असून आयपीएलमध्येही त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. हा फॉर्मेट त्याच्यासाठी नवीन नाही, असेही गावस्कर यांनी स्पष्ट केले.
याचदरम्यान सुनील गावस्कर यांनी एक मजेशीर पण अर्थपूर्ण किस्साही सांगितला. अलीकडेच आपण शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत एकाच विमानातून प्रवास केला होता, असे त्यांनी सांगितले. त्या वेळी आपण शुभमन गिलला “घरी कोणाला तरी दृष्ट काढायला सांग” असा सल्ला दिला, असे गावस्कर म्हणाले. अलीकडच्या काळात शुभमनला झालेल्या दुखापती पाहता आपण तसे म्हटल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत उपकर्णधार असलेल्या शुभमन गिलने 4, 0 आणि 28 अशा धावा केल्या होत्या. चौथा सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर पाचव्या सामन्यात दुखापतीमुळे त्याला मैदानात उतरता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर त्याची विश्वचषकातून गच्छंती झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, टी-20 विश्वचषकासाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून अक्षर पटेल उपकर्णधार असेल. संघात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, शिवम दुबे, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि ईशान किशन यांचा समावेश आहे. टी-20 विश्वचषकातील भारतीय संघाची मोहीम 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध सुरू होणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी दिल्लीत नामिबियाविरुद्ध, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये पाकिस्तानविरुद्ध आणि 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये नेदरलँड्सविरुद्ध भारताचे सामने होणार आहेत.