नगरपरिषद निकालाच्या दिवशी शिंदेंचा राजकीय धमाका

21 Dec 2025 09:19:59
मुंबई,
Shinde's political bombshell नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच पालघर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच दिवशी जोरदार राजकीय खेळी करत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का दिला आहे. ठाकूर गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला असून त्यामुळे पालघरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक विमल पाटील आणि केशव पाटील यांनी सुमारे ४०० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. पालघर जिल्हा शिवसेना अध्यक्ष निलेश तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात नव्याने प्रवेश करणाऱ्या नेत्यांनी धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह स्वीकारले. नगरनिवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडल्याने बहुजन विकास आघाडीला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
 

eknath shinde 
 
निवडणुकीच्या तोंडावरच माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते पक्ष सोडत असल्यामुळे हितेंद्र ठाकूर यांची अडचण वाढल्याचे चित्र आहे. पालघरमध्ये आतापर्यंत मजबूत पकड असलेल्या बहुजन विकास आघाडीसमोर आता शिवसेनेचे आव्हान अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. या पक्षप्रवेशामुळे पालघर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही घडामोड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, पालघरनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतही मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शहरात जोरदार तयारी सुरू केली असून सत्तास्थापन करण्याच्या दृष्टीने पक्षाने राजकीय कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेते आणि माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नवी मुंबईतही शिवसेनेची राजकीय ताकद वाढताना दिसत असून पक्षप्रवेशांचा धडाका सुरू असल्याचे चित्र आहे. या सोहळ्याला शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड शिवसेनेसाठी निर्णायक ठरू शकते.
Powered By Sangraha 9.0