एकाच घरातील सहा उमेदवार आणि सहाही पराभूत!

21 Dec 2025 14:31:19
नांदेड,
six candidates from same family defeated नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी भारतीय जनता पक्षाने एका घराण्यातील सहा जणांना उमेदवारी दिली होती, मात्र मतदारांनी घराणेशाहीला थारा नसल्याचे दाखवत या सर्व उमेदवारांना नाकारले. नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती, तर नगरसेवक पदांसाठी पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे आणि भाच्याची पत्नी रिना अमोल व्यवहारे यांना निवडणुकीत उतरवले होते.
 
 

six candidates from same family defeated 
मतदानानंतर झालेले निकाल पाहता, नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. लोहा नगरपरिषदेतील एकूण 10 प्रभागांसाठी 20 नगरसेवक पदांसाठी लढत झाली, ज्यात भाजपने सर्व जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र, घराणेशाहीवर आधारित ही रणनीती जनतेला पटली नाही आणि सर्व उमेदवार पराभूत झाले. लोहा नगरपरिषदेच्या या निकालामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला विशेषतः खासदार अशोक चव्हाण यांना धक्का बसला आहे. भाजपकडून नेहमी काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप केले जात असताना, स्वतःच्या घराण्यातील उमेदवारांना तिकीट देऊन हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला बळी पडले आहे. मतदारांनी स्थानिक राजकारणात स्पष्ट संदेश दिला असून, घराणेशाहीवर मतदारांचा विश्वास संपला असल्याचे समोर आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0