ढाका,
Ten arrested in the lynching case of Hindu बांगलादेशमध्ये प्रसिद्ध विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर सामाजिक आणि सांप्रदायिक तणाव तीव्र झाला आहे. हादी यांच्या मृत्यूमुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने झाली. याच वेळी, मैमनसिंग जिल्ह्यातील जातीय तणावाच्या घटनेत २५ वर्षीय हिंदू तरुण दीपू चंद्र दास याला जमावाने मारहाण करून ठार केले आणि मृतदेह झाडाला लटकवून जाळून टाकला. या प्रकरणात पोलिस आणि रॅपिड अॅक्शन बटालियनने १० जणांना अटक केली असून इतर संशयित ताब्यात घेतले जात आहेत. घटनेमुळे अल्पसंख्याकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला असून, अंतरिम सरकारने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान वृत्तपत्र कार्यालयांवर हल्ले आणि माध्यमांची तोडफोड झाली. सिल्हेट शहरातील भारतीय सहाय्यक उच्चायुक्त कार्यालय, व्हिसा अर्ज केंद्र आणि उच्चायुक्तांचे निवासस्थान याठिकाणी सुरक्षा कडक करण्यात आली आहे. हादी यांना १२ डिसेंबर रोजी ढाकाच्या बिजॉयनगर भागात प्रचारादरम्यान मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी गोळी झाडली होती. गंभीर जखमी झालेल्या हादी यांना उपचारासाठी सिंगापूरमध्ये नेण्यात आले, जिथे १८ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार ढाका विद्यापीठाजवळ राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या समाधीसमोर कडक सुरक्षेत पार पडला. हजारो लोक उपस्थित होते, तर निदर्शक “दिल्ली किंवा ढाका – ढाका, ढाका” अशा घोषणांमध्ये सामील होते. हादीच्या पक्षाने अंतरिम सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आणि हत्येप्रकरणातील दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.