नवी दिल्ली,
The wrath of Muslim clerics बांगलादेशमध्ये एका हिंदू तरुणाची जमावाकडून निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण उपखंडात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणावर मुस्लिम धर्मगुरूंनीही तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना, अशा प्रकारची कृत्ये घडली की मुस्लिम म्हणून लज्जेने मान खाली घालावी लागते, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. बांगलादेशमधील दीपू चंद्र दास या तरुणावर ईशनिंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर जमावाने त्याला मारहाण करत ठार केले आणि मृत्यूनंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवून जाळण्यात आल्याची माहिती समोर आली. या घटनेवर बोलताना मदनी म्हणाले की, कोणत्याही सुसंस्कृत समाजात कोणालाही दुसऱ्याचा जीव घेण्याचा अधिकार नाही. चूक कितीही गंभीर असली, तरी शिक्षेसाठी ठरलेली कायदेशीर प्रक्रिया असते आणि तीच पाळली गेली पाहिजे.

ही घटना अत्यंत घृणास्पद असल्याचे सांगत मदनी यांनी स्पष्ट केले की, जर गुन्हेगार मुस्लिम असतील आणि पीडित बिगर मुस्लिम असेल, तर हा गुन्हा आणखी गंभीर ठरतो. इस्लाम कोणालाही मारण्याची किंवा अपमानित करण्याची परवानगी देत नाही, तसेच अशा हिंसाचाराला कोणत्याही परिस्थितीत मान्यता देत नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. या घटनेचा कितीही तीव्र निषेध केला तरी तो अपुरा असल्याचेही त्यांनी सांगितले. संपूर्ण उपखंडात वाढत चाललेला अतिरेकीपणा ही चिंतेची बाब असून त्याला आवर घालण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, ऑल इंडिया इमाम्स ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम डॉ. इमाम उमर अहमद इलियासी यांनीही या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी या हत्येला मानवतेची हत्या असे संबोधले.
ज्या अमानुष पद्धतीने तरुणाची हत्या करण्यात आली आणि मृत्यूनंतर त्याच्या शरीराशी जे वर्तन करण्यात आले, ते पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. झाडाला लटकवून मृतदेहाची विटंबना करणे ही अत्यंत क्रूर बाब असल्याचे ते म्हणाले. इलियासी यांनी यावेळी बांगलादेशच्या भूमिकेवरही टीका केली. भारताने नेहमीच बांगलादेशला मदतीचा हात दिला असताना, अशा घटनांमधून कृतघ्नता दिसून येते, असे ते म्हणाले. तसेच मानवाधिकार संघटना या घटनेवर गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा हिंसक कृत्यांना इस्लामिक शिकवण कधीच समर्थन देत नाही आणि अशा कृत्यांमध्ये सहभागी असलेले लोक इस्लामचे खरे अनुयायी असू शकत नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या प्रकरणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.