मुंबई,
Tu Meri Main Tera movie, कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांचा आगामी चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा’ प्रदर्शित होण्यापूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस निमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, त्रिमूर्ती फिल्म्सने धर्मा प्रॉडक्शन, नमः पिक्चर्स, संगीत लेबल सारेगामा आणि रॅपर बादशाह यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे.
त्रिमूर्ती फिल्म्सने दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की १९९२ च्या विश्वात्मा’ चित्रपटातील क्लासिक गाणे ‘सात समुंदर पार’ या गाण्याचा टीझरमध्ये मूळ निर्मात्याच्या परवानगीशिवाय वापर करण्यात आला आहे. याचिकेत म्हटले आहे की, टीझरमध्ये गाण्याचे सिग्नेचर बीट्स आणि हुक लाईनचा प्रमुखपणे वापर करण्यात आला असून, हे कॉपीराइट उल्लंघन तसेच नैतिक अधिकारांचे उल्लंघन ठरते. यामुळे त्रिमूर्ती फिल्म्सने अंतरिम मनाई आणि १० कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
याचिकेत असेही म्हटले आहे की, जरी सारेगामाकडे गाण्याचे वितरण अधिकार असले, तरी मूळ निर्मात्याच्या संमतीशिवाय कोणत्याही चित्रपटात गाण्याचा सिंक परवाना देण्याचा अधिकार त्यांना नव्हता. १९९० च्या करारानुसार, सारेगामाला केवळ मर्यादित यांत्रिक अधिकार देण्यात आले होते, आणि कोणत्याही नवीन चित्रपटात गाण्याचा रीमिक्स किंवा सिंक्रोनायझेशन करण्यासाठी परवाना घेण्याचा अधिकार नाही, असे याचिकेत नमूद केले आहे.
खटल्यात प्रतिवादींवर संगनमताने काम करण्याचा, हक्कांचे चुकीचे प्रतिनिधित्व करण्याचा आणि इतरांना चुकीची माहिती देण्याचा आरोपही करण्यात आला आहे.
मुंबई उच्च Tu Meri Main Tera movie, न्यायालयाच्या न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकल खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने प्रतिवादींना त्यांचे उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देत पुढील सुनावणी २२ डिसेंबर रोजी ठरवली आहे. या सुनावणीत त्रिमूर्ती फिल्म्सच्या वतीने ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड आणि वकील हिरेन कमोद उपस्थित होते, तर खटला वकील रश्मी सिंह आणि करण खियानी यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आला.चित्रपटाचे रिलीज जवळ आले असूनही, या कोर्टखटल्यामुळे त्याच्या प्रदर्शनावर काहीसा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज आहे. ट्रेलर आणि टीझरच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावरही याबाबत चर्चा सुरू झाली असून, चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता आणि तणाव दोन्ही पाहायला मिळत आहेत.