तुमसर,
Tumsar Municipal Election एक माजी आमदार, दोन माजी नगराध्यक्ष अशा तीन दिग्गजांना धूळ चारीत राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार सागर गभणे यांनी विजयी मिळविला आहे. त्यांच्या विजयामुळे तुमसर शहराला एक तरुण नगराध्यक्ष मिळाला आहे. तुमसरात भाजपला 10, राष्ट्रवादीला 10, काँग्रेसला तीन, शिवसेनेला 1 आणि अपक्ष 1 असे नगरसेवक निवडून आले आहेत.
उमेदवारी मिळविण्यापासूनच कायम चर्चेत असलेल्या तुमसर नगर परिषदेचा निकालही चांगलाच चर्चेत राहिला. भाजपचे उमेदवार प्रदीप पडोळे यांनी सुरुवातीला निवडणूक लढविणार नाही, असे सांगून नाराजी व्यक्त केली होती. मात्र नंतर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी सागर गभने यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. राष्ट्रवादीने माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांना रिंगणात उतरविले. तेव्हापासूनच त्यांचा विरोध झाला होता. राष्ट्रवादीचे बंडखोर सागर गभणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्याला राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी अलिखित समर्थन जाहीर केले. काँग्रेसने माजी आमदार अनिल बावनकर यांना रिंगणात उतरवले होते. मात्र तुमसरच्या जनतेनी यावेळी तरुण उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेत, सागर गभणे यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. त्यांनी अभिषेक कारेमोरे यांचा 1042 मतांनी पराभव केला. अनेक दिग्गज यांना पराभूत करून गभणे अव्वल ठरले.
12 प्रभागात तुमसरच्या जनतेने भाजपच्या बाजूने 10, राष्ट्रवादीच्या बाजूने 10, काँग्रेसचे तीन, शिवसेना एक आणि अपक्ष एक नगरसेवक निवडून देत संमिश्र कल दिला.