नांदगाव पेठ,
vidarbha-level-shankarpat : संत काशिनाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त नांदगाव पेठ येथे आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरीय शंकरपटाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संत काशिनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, तसेच शंकरपट मैदान व बैलजोडीचे पूजन करून मोठ्या उत्साहात उद्घाअन करण्यात आले. उद्घाटनानंतर आ. राजेश वानखडे यांनी स्वतः बैलगाडा चालवत शेतकरी संस्कृतीप्रती आपले प्रेम व्यक्त केले. मंचावर उदघाटक म्हणून स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच कविता डांगे, शेतकरी मित्र परिवार आयोजन समितीचे ज्ञानेश्वर इंगळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय चौधरी, ट्रस्टचे पदाधिकारी मिलिंद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष वीरेंद्र लंगडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष विजय भुयार, गजानन कडू, संजय तायडे, अरविंद पंडित, प्रवीण अळसपुरे, जुनेद नवाब आदी मान्यवर उपस्थित होते.
विवेक गुल्हाने यांनी प्रास्ताविकातून शंकरपट आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सरपंच कविता डांगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शंकरपटाच्या माध्यमातून शेतकरी संस्कृतीचा गौरव होत असून, नांदगाव पेठमध्ये हा सोहळा अनेक दिवस स्मरणात राहील, अशी भावना उपस्थित नागरिकांमधून व्यक्त होत होती. या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यांतून तब्बल ६५ नामवंत बैलजोडी धारकांनी सहभाग नोंदविला.१५ उत्कृष्ट शेतकर्यांचा सत्कार देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. शिस्तबद्ध आयोजन, उत्कृष्ट बैलजोडी, स्पर्धेतील चुरस आणि प्रेक्षकांची मोठी गर्दी यामुळे नांदगाव पेठ परिसरात अक्षरशः यात्रेसारखे वातावरण पाहायला मिळाले. शेतकरी बांधव, युवक-युवती, महिला व वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.