ढाका,
Violence erupts in Bangladesh बांगलादेशात विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचाराने गंभीर वळण घेतले असून एका संतापलेल्या जमावाने सात वर्षांच्या निष्पाप मुलीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, शनिवारी लक्ष्मीपूर सदर उपजिल्ह्यात एका बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) नेत्याच्या घराला बाहेरून कुलूप लावून आग लावण्यात आली. या आगीत एका मुलीचा होरपळून मृत्यू झाला, तर घरातील अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या व्यापक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. १२ डिसेंबर रोजी ढाकाच्या विजयनगर भागात निवडणूक प्रचार सुरू असताना मुखवटा घातलेल्या अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हादी यांच्या डोक्यात गोळी झाडली होती. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सिंगापूरला हलवण्यात आले होते, मात्र गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शनिवारी ढाका विद्यापीठाजवळील राष्ट्रीय कवी काझी नजरुल इस्लाम यांच्या समाधीजवळ कडक सुरक्षेत त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले. हादी यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण बांगलादेशात हिंसाचाराचे लोण पसरले आहे. विविध ठिकाणी जाळपोळ, तोडफोड आणि हल्ल्यांच्या घटना घडत असून गुरुवारी चट्टोग्राममधील सहाय्यक भारतीय उच्चायुक्तांच्या निवासस्थानावरही दगडफेक करण्यात आली होती. अंत्यसंस्कारानंतर लगेचच हादी यांच्या इन्कलाब मंच या संघटनेने अंतरिम सरकारला थेट २४ तासांचा अल्टिमेटम दिला असून हत्येस जबाबदार असलेल्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
शनिवारी दुपारी ढाक्यातील शाहबाग चौकात हजारो लोक एकत्र जमल्यानंतर हा अल्टिमेटम जाहीर करण्यात आला. इन्कलाब मंचाच्या वतीने बोलताना संघटनेच्या नेत्यांनी सरकारवर तीव्र टीका केली आणि दोषींना अटक न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला. शाहबाग हेच ठिकाण जिथून बांगलादेशातील सत्तांतराची चळवळ सुरू झाली होती, त्या ठिकाणी हादी यांचे स्मारक उभारावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. ३२ वर्षीय शरीफ उस्मान हादी हे जुलै २०२४ च्या जनआंदोलनातील प्रमुख चेहरे होते. भारताचे कट्टर टीकाकार म्हणून ओळखले जाणारे हादी इन्कलाब मंचाचे प्रवक्ते होते आणि आगामी १३ व्या संसदीय निवडणुकीत ढाका-८ मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची त्यांनी घोषणा केली होती.