यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी शांततेत

21 Dec 2025 20:40:39
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-municipal-council-election-vote-counting : यवतमाळ जिल्ह्यात 10 नगर परिषदेसह एका नगर पंचायतची मतमोजणी प्रक्रिया रविवार, 21 डिसेंबर रोजी शांततेत पार पडली. यात वणी येथे विद्या आत्राम, पांढरकवडा नगर परिषद अध्यक्षपदी आतीश बोरेले या भाजपा उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर घाटंजी नप अध्यक्षपदी परेश कारिया (काँग्रेस), दारव्हा सुनील चिरडे (शिवसेना), पुसद मोहिनी नाईक राष्ट्रवादी काँग्रेस (अप), आर्णी नालंदा भरणे (काँग्रेस), उमरखेड तेजश्री जैन (जनशक्ती पॅनल), दिग्रस पंचशिला इंगोले (उबाठा), नेर सुनीता जयस्वाल (शिवसेना) व ढाणकी अर्चना वासमवार (शिवसेना उबाठा) यांनी नगर पंचायत अध्यक्षपदी बाजी मारली. यवतमाळ नगर परिषदेची मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरूच होती.
 
 
ytl
 
 
पुसद नगर परिषद निवडणूक:  अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत मोहिनी नाईक विजयी
 
पुसद, 
नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अप गटाच्या उमेदवार मोहिनी इंद्रनील नाईक यांचा 645 मतांनी विजय झाला. भाजपाचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांना 8 हजार 490 मते मिळाली. एमआयएमचे उमदेवार सय्यद सिद्दीकोद्दीन सय्यद सफोदोद्दीन यांना 949 मते मिळाली. अध्यक्षपदाचे विजयी उमेदवार राष्ट्रवादीच्या मोहिनी नाईक यांना 12 हजार 988 मते मिळाली. तर मविआचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. महंमद नदीम यांना 12 हजार 343 मते मिळाली. पुसद नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली.
 
 
दरम्यान अध्यक्षपदाचे शिवसेनेचे उमेदवार अनिल ठाकूर यांना 1 हजार 966 मते मिळाली तर अपक्ष राजू दुधे यांना 1 हजार 785 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न पुंडलिक भालेराव यांना 256 तसेच अपक्ष दिलीप रायपूरकर यांना 104, रेश्मा लोखंडे 83 मते मिळाली. तर 206 मतदारांनी नोटाला मतदान केले.
 
 
पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवकात राष्ट्रवादी काँग्रेस (अप) 14, काँग्रेस 6, भाजपा 5, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) 3 तसेच अपक्ष 3 असे पक्षीय बलाबल आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल तसेच तहसीलदार महादेव जोरवर यांनी निवडणुकीचे कामकाज सांभाळले.
 
उमरखेडमध्ये बस सुसाट: नप अध्यक्षपदी तेजश्री जैन विजयी
  
उमरखेड, 
2 डिसेंबर रोजी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल रविवार, 21 डिसेंबर रोजी लागला. या निवडणुकीत काँग्रेसने पक्ष चिन्ह बाजूला ठेवून शिवसेना (उबाठा) व विदर्भ-मराठवाडा विकास आघाडीशी समन्वय ठेवून स्थापन केलेले जनशक्ती पॅनल यशस्वी ठरले.
 
 
या ठिकाणी नप अध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री संतोष जैन यांच्यासह 26 नगरसेवकांपैकी तब्बल 17 जागा जिंकून जनशक्ती पॅनलने निर्विवाद बहुमत सिद्ध केले. या निवडणुकीत भाजपाच्या निधी नितीन भुतडा यांचा 984 मताने पराभव झाला. 13 प्रभागातील 26 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे 9 नगरसेवक निवडून आले.
 
 
ही निवडणूक खèया अर्थाने तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ठरण्याची शक्यता आहे. प्रभाग 1 मध्ये भाजपाचे दोन्ही उमेदवार निवडून आले. त्यामध्ये अभियंता सुरेंद्र कोडगिरवार ईश्वरचिठ्ठीवर निवडून आले. त्यांना व ईश्वरचिठ्ठीत पराभूत झालेले संदीप ठाकरे या दोघांनाही समसमान 728 मते मिळाली होती.
 
 
निवडणुकीत एमआयएम काय करिष्मा करेल याबाबत मोठे तर्कवितर्क लावल्या गेले होते. परंतु, पूर्व अनुमानानुसार प्रभाग 2, प्रभाग 3, प्रभाग 12 व 13 या ठिकाणी एमआयएमच्या उमेदवारांनी निकरीची लढत दिली. तरी बहुतांश मुस्लिम समाज हा जनशक्ती पॅनलच्या दिशेने झुकल्याने मागच्यावेळी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला एमआयएम पक्ष यंदा मात्र भोपळाही फोडू शकला नाही. वास्तविक, जनशक्ती पॅनलला निवडणूक चिन्ह अखेरचे चार दिवसच बाकी असताना मिळाल्याने या चिन्हाचा प्रचार करण्याची पाहिजे तशी मुभा मिळाली नव्हती.
मुस्लीम नेत्यांचा लक्षणीय सहभाग
 
 
उमरखेड नपच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम नेत्यांनी आपसातील मतभेद व गटबाजी विसरून शिवसेना (उबाठा) गटासह काँग्रेसच्या बरोबरीने सहभाग घेवून जनशक्ती पॅनलच्या विजयात मोलाचे योगदान निभावले, हे या विजयाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
मातब्बरांचा पराभव
 
 
या निवडणुकीत माजी नगरअध्यक्ष राजू जयस्वाल व सिद्दीक कुरेशी यांची पत्नी तसेच पाणीपुरवठा सभापती दिलीप सुरते, शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार, नगरसेवक सविता पाचकोरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर नगरसेवक संदीप ठाकरे यांचा ईश्वरचिठ्ठीमुळे पराभव झाला.
नगर परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवारांना मिळालेली मते :
 
1 ) तेजश्री जैन (जनशक्ती पॅनल) 11103 मते
2 ) निधी भुतडा (भाजपा) 10119
3 ) शारदा जाधव (शिवसेना शिन्दे गट) 1333
4 ) शमीम बी. सय्यद युसुफ (एमआयएम) 3613
5 ) सरोज देशमुख (राकॉ श. प.) 735
प्रभागनिहाय निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते :
प्रभाग एक : 1 ) ज्योत्सना प्रतीक रुडे (747 ) भाजपा
पराभुत : संगीता दारासिंग रुडे (जनशक्ती 471 )
2 ) सुरेंद्र कोडगीरवार (728 ईश्वरचिठ्ठी) भाजपा
पराभूत : संदीप ठाकरे (जनशक्ती 728)
प्रभाग दोन : 1 ) गनी अनवर अली शहा (1104) जनशक्ती पॅनल
पराभुत : मुजीब बागवान (एमआयएम 1095)
2 ) फरजाना स. रहिम (1036 ) जनशक्ती पॅनल
पराभूत : ताहेराबी शे.हमीद ( एमआयएम 889 )
प्रभाग तीन : 1 ) नाजेरा परविन शे. शकील (854) जनशक्ती पॅनल
पराभूत : जया प्रकाश जाधव (715 भाजपा)
2 ) साजीद जहागिरदार (603) जनशक्ती पॅनल
पराभूत : सोनू खतीब (अपक्ष 543)
प्रभाग चार : 1 ) रुपाली सुधीर कवाणे (1051 ) जनशक्ती पॅनल
पराभूत : कल्पना अनखुळे (715 भाजपा )
2 ) गणेश खंदारे (853 ) जनशक्ती पॅनल
पराभुत : दिलीप सुरते ( भाजपा 563 )
प्रभाग पाच : 1 ) कविता राहुल काळबांडे (936 ) जनशक्ती पॅनल
पराभुत : स्वाती गजानन पाचकोरे ( भाजपा 913)
2 ) विजय हरडफकर (852 ) भाजपा
पराभुत : सुरेश कदम (669 जनशक्ती )
प्रभाग सहा : 1 ) विरेंद्र खंदारे (553 ) जनशक्ती पॅनल
पराभुत : सविता पाचकोरे (538 भाजपा )
2 ) वंदना सचिन घाडगे (598 ) भाजपा
पराभुत : संगीता कानडे (576 जनशक्ती पॅनल )
प्रभाग सात : 1) प्रकाश शिकारे (777) जनशक्ती पॅनल
पराभूत : दिनेश आत्राम (652 भाजपा)
2 ) स्वाती गजेंद्र ठाकरे (922) जनशक्ती पॅनल
पराभुत : प्रीती अमोल सूर्यवंशी (499 भाजपा)
प्रभाग आठ : 1 ) खुशबू पवन मेंढे (759) भाजपा
पराभूत : सुमन बाभुळकर (735 जनशक्ती)
2 ) अमोल तिवरंगकर (614) भाजपा
पराभुत : नितीन शिन्दे (535 जनशक्ती)
प्रभाग नऊ : 1 ) राधा कैलास इंगोले (746) जनशक्ती पॅनल
पराभुत : नंदा शेवंतराव गायकवाड (643 भाजपा)
2) गोपाल कलाणे (718) भाजपा
पराभुत : दत्ता शिन्दे (543 जनशक्ती)
प्रभाग दहा : 1) करुणा पुंडलिक कुबडे (1308) भाजपा
पराभूत : सुनीता शहाणे (974 जनशक्ती पॅनल)
2) भास्कर साधू (1233) भाजपा
पराभूत : महेश आलट (753 जनशक्ती)
प्रभाग अकरा : 1) गजानन रासकर (988) जनशक्ती पॅनल
पराभुत : प्रकाश दुधेवार (921 भाजपा)
2) वैष्णवी सागर लाहेवार (992 ) जनशक्ती पॅनल
पराभुत : संतोषी संतोष हिंगमीरे (841 भाजपा)
प्रभाग बारा : 1 ) शबाना बी. फरीन पठाण (1016 ) जनशक्ती पॅनल
पराभूत : नाजेमा बी. सिद्दीक कुरेशी (699 एमआयएम)
2 ) शे. रसुल पटेल ( 619 ) जनशक्ती पॅनल
पराभुत : मो . अकिल कुरेशी (586 अपक्ष )
प्रभाग तेरा : 1 ) जुबेर कुरेशी (1036) जनशक्ती पॅनल
पराभूत : शे . जाकीर शे.रऊफ (839 राकाँ घड्याळ )
2 ) मरियम स . इब्राहीम (970 ) जनशक्ती पॅनल
पराभुत : तबस्सुम शे.असलम (887 एमआयएम ).
------------------------------
 
घाटंजीमध्ये ‘गड आला पण सिंह गेला’
 
घाटंजी : घाटंजी नगर परिषदेत लागलेल्या निकालानुसार भाजपाची ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली आहे. भाजपाचे नप अध्यक्ष पदाचे उमेदवार महेश पवार यांचा 511 मतांनी पराभव करून काँग्रेसचे परेश कारिया नप अध्यक्षपदी निवडून आले. काँग्रेसचे परेश कारिया यांना 4957 मते पडली, तर भाजपाचे महेश पवार यांना 4446 मते पडली. घाटंजी नगर परिषद निवडणुकीत भाजपाची कामगिरी चांगली झाली असून भाजपाचे एकूण 12 नगरसेवक निवडून आले. तर काँग्रेसचे 6, वंचित बहुजन आघाडी 1 व अपक्ष 1 अशा प्रकारे पक्षीय संख्याबळ आहे.
-----------------------------------
 
पांढरकवडा नगर परिषदेवर भाजपाचे: आतिश बोरेले नप अध्यक्षपदी विजयी
पांढरकवडा, 
अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपाचे आतिश लक्ष्मण बोरेले यांनी शिवसेनेचे डॉ. अभिनय नहाते यांचा 203 मताने पराभव करीत नगर परिषद पांढरकवडा निवडणुकीत बाजी मारली. तर शिवसेनेच्या उमेदवारांनी 16 प्रभागात तर भाजपाच्या उमेदवारांनी 6 प्रभागात बाजी मारली. नगराध्यक्ष पदाचे भाजपाचे उमेदवार आतिश लक्ष्मण बोरेले यांना 7829 तर शिवसेनेचे डॉ. नहाते यांना 7626 मते मिळाली.
 
 
प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये कल्पना रमेश गेडाम, 1 ब मध्ये प्रफुल मोरेश्वर जिद्देवार या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकला. प्रभाग क्रमांक 2 अ मध्ये भाग्यश्री रवींद्र कडू आणि प्रभाग क्रमांक 2 ब मध्ये नीलेश चिंचाळकर हे दोन्ही शिवसेना उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक 3 अ मध्ये मंगेश रमेश वातीले, 3 ब मध्ये प्रियंका स्वप्नील बोकीलवार या दोन्ही भाजपा उमेदवारांनी विजय प्राप्त केला.
 
 
प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये जयश्री अतिश शेंडे व 4 ब मध्ये शैनिला सबरीन समीरखान या दोन्ही महिला शिवसेना उमेदवार विजयी झाले. प्रभाग 5 अ मध्ये योगेश माधव कर्णेवार हे शिवसेना उमेदवार तर 5 ब मध्ये शितल संदीप बाजोरिया या भाजपा उमेदवार विजयी झाल्या. प्रभाग 6 अ मध्ये भाजपाचे रुपेश राजा कुटकलवार, 6 ब मध्ये शिवसेना उमेदवार दीपाली दीपक नक्षणे विजयी झाल्या.
 
 
7 अ मध्ये सुरेखा रमेश कटकमवार, 7 ब मध्ये मोहंमद युसुफ मोहंमद शब्बीर दोघेही शिवसेना उमेदवार विजयी झालेत. प्रभाग 8 अ मध्ये भाजपा उमेदवार रेखा राम चितारलेवार, 8 ब मध्ये शिवसेना उमेदवार आतिश तानाजी चव्हाण विजयी झालेत. प्रभाग 9 अ मध्ये गणेश गोवर्धन धुर्वे, 9 ब मध्ये सविता किशोर गटलेवार हे दोन्ही शिवसेना उमेदवार विजयी झाले. प्रभाग 10 अ मध्ये भाजपा उमेदवार अनिल भगवान बोरेले आणि 10 ब मध्ये शिवसेना महिला उमेदवार लक्ष्मी सतीश जाधव विजयी झाल्या. प्रभाग 11 अ मध्ये करिश्मा पवन कुडमेथे, 11 ब मधून सरफउद्दीन काझी हे दोन्ही शिवसेना उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे 16 उमेदवार विजयी झाल्याने त्यांची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली. तर भाजपाने मागील पराभवाचे उट्टे भरून काढत नगराध्यक्षपदी कब्जा केल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
--------------------
दारव्हा नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील चिरडे विजयी
दारव्हा, 
नगरपरिषदेची निवडणूक मतमोजणीत नगराध्यक्षपदी विजयी झालेले शिवसेना (शिंदे) गटाचे सुनील नामदेव चिरडे यांना 7190 मते मिळाली. प्रतिस्पर्धी सलीम परिबक्ष राष्ट्रवादी (अप गटाचे) यांना 5179 मते मिळाली. यामध्ये 2011 मतांनी सुनील चिरडे विजयी झाले.
 
 
तर 11 प्रभागात 22 उमेदवारांत शिवसेनेचे 12, काँग्रेस 7, भाजपा 2, समाजवादी 1 असे विजयी उमेदवार निवडून आले. ते अश्या प्रकारे :
 
प्रभागानिहाय निवडून आलेले नगरसेवक
 
प्रभाग क्रमांक 1
1) शाह राबीयाबी अजिम शाह - कॉग्रेस
2) शेख नासिर शेख मन्सूर - कॉग्रेस
प्रभाग क्रमांक 2
1) धनंजय बलखंडे - भाजपा
2) पल्लवी प्रशांत वाकोडे - शिवसेना
प्रभाग क्रमांक 3
1) सीमा गजेंद्र चव्हाण - शिवसेना
2) संतोष येडमे -शिवसेना
प्रभाग क्रमांक 4
1) एकनाथ माहूरकर - शिवसेना
2) कविता रविंद्र शिले - शिवसेना
प्रभाग क्रमांक 5
1) विशाखा संजय बिहाडे - शिवसेना
2) खान मसुद अहमद मनसब खान - कॉग्रेस
प्रभाग क्रमांक 6
1) सचिन (बाबू) जाधव - शिवसेना
2) जमिला लक्ष्मण चौधरी - समाजवादी पार्टी
प्रभाग क्रमांक 7
1) रोनित हरीभाऊ गुल्हाने - भाजपा
2) दीपा मनोज सिंगी - शिवसेना
प्रभाग क्रमांक 8
1) पौर्णिमा वैभव निमकर - शिवसेना
2) प्रकाश दुधे - शिवसेना
प्रभाग क्रमांक 9
1) वैशाली सुभाष खाटीक - शिवसेना
2) कृष्णा शेलोकार - शिवसेना
प्रभाग क्रमांक 10
1) सैय्यद फारुख - कॉग्रेस
2) शमिम बेगम हो युसुफ - कॉग्रेस
प्रभाग क्रमांक 11
1) खान सरफाज अहमद मोबीन - कॉग्रेस
2) शगुफता शे. अब्दुल - कॉग्रेस
मतदान प्रक्रीया निवडणुक निर्णय अधिकारी रवी काळे, सहायक निवडणुक अधिकारी मुख्याधिकारी विठ्ठल केदारे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. यशस्वीतेसाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस अधिकारी कर्मचाèयांनी परीश्रम घेतले.
-----------------------
ढाणकी नपंत उबाठाच्या अर्चना वासमवार नगराध्यक्षपदी
ढाणकी, 
उबाठा पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आला नसताना ढाणकी नगर पंचायात अध्यक्षपदी उबाठाच्या अर्चना सुंदरकांता वासमवार या 3200 मतदान घेऊन बहुमताने विराजमान झाल्या.
 
 
नगरपंचायतचे मतदान 2 डिसेंबर रोजी पार पडले. गेल्या 18 दिवसापासून ढाणकीकरांनी नेमका कौल दिला कुणाला, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. विकासात्मक कामाच्या अपेक्षेमुळे मतदारांनी नवीन चेहèयाला पसंती देत अर्चना वासमवार यांना विजयी केले. तर भाजपा 2649 मतांनी दुसèया स्थानावर, काँग्रेस 2612 मतांनी तिसèया स्थानावर, शिवसेना शिंदे 1883 मतांनी 4 थ्या स्थानावर राहिली.
 
 
नगरसेवकांत भाजपाचे एकूण 7 नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचे एकूण 3 नगरसेवक, एमआयएमचे एकुण 3 नगरसेवक, काँग्रेसचे 2 नगरसेवक व अपक्ष 2 नगरसेवक असा संमिश्र कौल ढाणकीकरांनी दिला. ढाणकीकरांनी पक्ष न बघता पर्याय व माणूस बघितला. राष्ट्रीय पक्षांनी मात्र चांगला माणूस देण्याऐवजी, ज्यांनी पूर्वी सत्ता उपभोगली अशांना तिकीट देत, स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतला होता.
----------------------
आर्णीमध्ये नगराध्यक्षपदी काँग्रेसचे नालंदा भरणे
आर्णी, 
नऊ वर्षांनंतर आर्णी नगरपरिषदेत निवडणुका झाल्या आणि अत्यंत चुरशीच्या निवडणुकीनंतर रविवारी मतमोजणी झाली. काँग्रेसचे नालंदा भरणे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे कुणाल मनवर यांचा 1267 मतांनी पराभव केला. आर्णी नगरपंचायतीच्या 11 प्रभागांमध्ये 22 जागांसाठी निवडणुका झाल्या, ज्यामध्ये काँग्रेसने 8, राष्ट्रवादीने (राष्ट्रवादी) 8, शिवसेना शिंदे 4 आणि शिवसेना उभाठा 1 जागा जिंकल्या. भाजपाने एका जागेवर विजय मिळवत पहिल्यांदाच खाते उघडले.
 
 
आर्णी नगरपंचायतीत 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत 17908 मतदारांनी मतदान केले. आर्णी नगरपरिषदेच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या. तहसील कार्यालयात कडक पोलिस बंदोबस्तात मतमोजणी सुरू झाली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या नालंदा भरणे यांना 4646, शिवसेनेचे कुणाल मनवर यांना 3379, भाजपचे राजू वाडेकर यांना 3333, राष्ट्रवादी काँग्रेसचे अश्वजित गायकवाड यांना 3145, शिवसेनेचे उबाठाचे लक्ष्मण पठाडे यांना 1847 आणि आम आदमी पक्षाचे संजय वाघमारे यांना फक्त 83 मते मिळाली, वंचित बहुजन आघाडीचे अश्वघोष भगत यांना 232 मते मिळाली तर अपक्ष गणेश हिरोळे यांना 757 मते मिळाली.
 
 
चेतन दुर्योधन इंगळे यांना 151, अनिल इंगोले यांना 133 मते, गजानन गोडवे यांना 69 मते मिळाली. काँग्रेसच्या नालंदा भरणे यांनी शिवसेनेच्या कुणाल मनवर (3379) यांचा 1267 मतांनी पराभव केला. नगराध्यक्ष नालंदा किसन भरणे यांच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात विजयाचा जल्लोष पाहायला मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाख वहुरवाघ आणि सह-निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र राऊत यांनी काम पाहिले.
-----------------------
प्रभागानुसार विजयी उमेदवार
 
प्रभाग क्र. 1
(अ) सुरेश पवन चाफले  शिंदे शिवसेना 487
(ब) छबू मनोज चारोळे शिंदे शिवसेना 581
प्रभाग क्र. 2
(अ) परशराम देवराव कूमरे राष्ट्रवादी अजित पवार 523
(ब) शेख रुक्साना परवीन मोहिबोद्दीन राष्ट्रवादी अजित पवार 517
प्रभाग क्र. 3
(अ) विशाल नारायण मनवर शिंदे शिवसेना 461
(ल) चैताली विशाल चव्हाण (देशमुख) भाजप 474
प्रभाग क्र. 4
(र) नीता खुशाल ठाकरे - काँग्रेस 799
(ब) अंजली संदीप खंदार राष्ट्रवादी अजित पवार 588
प्रभाग क्र. 5
(अ) अशपाक खालिक शेख राष्ट्रवादी अजित पवार 726
(ब) निलोफर साजिद बेग राष्ट्रवादी अजित पवार 788
प्रभाग क्र.6
(अ) अश्विनी संजय राऊत  काँग्रेस 490
(ल) संजय बंडू व्यवहारे  राष्ट्रवादी अजित पवार 611
प्रभाग क्र. 7
(अ) वर्षा विशाल रसमवार - राष्ट्रवादी अजित पवार 561
(ल) अन्वर खान सरदार खान पठाण-राष्ट्रवादी अजित पवार 617
प्रभाग क्र. 8
(अ) शफी अ. रज्जाक मलनस - काँग्रेस 814
(ब) यास्मिन बानो रहमान शाह - काँग्रेस 683
प्रभाग क्र. 9
(अ) भावना जयराज मुनेश्वर - काँग्रेस 657
(ल) रियाझ वहाब सय्यद - काँग्रेस 640
प्रभाग क्र. 10
(र) प्रीती योगेश शिवरामवार - काँग्रेस 672
(ल) अमोल सुधाकर मांगुळकर - काँग्रेस 640
प्रभाग क्रमांक 11
(अ) शितल प्रवीण काळे उभा - शिवसेना 522
(ल) नीलेश रमेश गावंडे शिंदे - शिवसेना 542
सख्ख्या नणंद-भावजय विजयी
 
 
आर्णी नप निवडणुकीत काँग्रेसचे संजय राऊत यांची बहिण प्रभाग 4 मध्ये नीता खुशाल ठाकरे 799 मते घेऊन विजयी झाल्या. तर त्यांची सख्खी भावजय संजय राऊत यांची पत्नी अश्विनी संजय राऊत या प्रभाग क्रमांक 6 मधून 490 मते घेऊन विजयी झाल्या.
----------------------
शिवसेनेच्या सुनीता जयस्वाल नप अध्यक्षपदी विजयी
 
नेर : नेर परसोपंत नगर परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवार सुनिता पवन जयस्वाल विजयी झाल्या असून त्यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीतील उबाठा सेनेच्या उमेदवार जयश्री नीतिन माकोडे यांच्याविरोधात 5028 मतांची आघाडी घेत प्रचंड विजय प्राप्त केला. सुनीता जयस्वाल यांना 9242 तर जयश्री माकोडे यांना 4214 मते मिळाली. एमआयएमचे उमेदवार आफरीन वाजिद खान यांना 3286 मते प्राप्त झाली. नगरसेवक पदाकरिता शिवसेना 5, भारतीय जनता पार्टी 2, काँग्रेस 4, उबाठा 2, एएमआयएमएम 2, प्रहार 1, तर 5 उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आले आहेत.
----------------------
दिग्रस नगराध्यक्ष उबाठाचा तर 16 नगरसेवक शिवसेनेचे
दिग्रस, 
दिग्रस नगर परिषद निवडणुकीचा रविवार,21 डिसेंबरला जाहीर झालेला निकाल हा अनपेक्षित ठरला. उबाठा गटाने नगराध्यक्षपदाची बाजी मारुन 6 नगरसेवक निवडून आणले. तर शिवसेनेचे तब्बल 16, 1 भाजपा, 1 एमआयएम व 1 अपक्ष असे एकूण 25 नगरसेवक निवडून आले.
 
 
नगर परिषद निवडणुक रिंगणात नगराध्यक्ष व 25 नगरसेवक निवडीसाठी ताकदीने उतरलेल्या शिवसेनेचे अगदीच कमी मतांनी लक्ष्मी कलोसे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पराजय स्वीकारावा लागला. तर उबाठाच्या पंचशिला इंगोले यांना विजयी घोषित करण्यात आले. शिवसेनेचे डॉ. संजय बंग, सचिन बनगिनवार व नुरमहंममद खान हे सर्व दिग्गज उमेदवारांनी आपले सहकारी उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवले.
 
 
नप अध्यक्षपदाची पुन्हा मतमोजणीची मागणी करण्यात आल्याने पूर्ण निकाल जाहीर करण्यास विलंब लागला होता. निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी, सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार मयुर राऊत व सहाय्यक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी गिरीष पारेकर यांनी नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर केला.
भाजपा शिवसेनेची युतीच हवी होती
 
 
25 वर्षानंतर भाजपाच्या कमळ चिन्हावर लक्ष्मी मेहता निवडून आल्याने भाजपाकडून समाधान व्यक्त होत आहे. सन्मानजनक युती झाली असती तर नगराध्यक्ष हा महायुतीचा निवडून आला असता 2016 मध्ये युती न झाल्याने शिवसेनेला नप अध्यपदाला मुकावे लागले होते. तर 9 वर्षानंतर पुन्हा 62 मतांनी शिवसेनेला नगराध्यक्षपदाला मुकावे लागले आहे.
Powered By Sangraha 9.0