तभा वृत्तसेवा दिग्रस,
Digras municipal election नगर परिषद निवडणुकीच्या कालच्या निकालाने शिवसेना व उबाठा गटाला अक्षरशः हतबल करुन ठेवल्याचे चित्र आहे. अनपेक्षित निकाल लागल्याने दोन्ही पक्षाला जल्लोष करावासा वाटलाच नाही. त्यांनी तो टाळला.
निवडणुकीचा निकाल जाहीर करताना शिवसेनेचे 25 पैकी एकएक करत 16 नगरसेवक उमेदवार निवडून आल्याचे जाहीर झाले. मात्र अखेरच्या क्षणी नप अध्यक्ष उमेदवार हरल्याचे जाहीर होताच सर्व उत्साह व जल्लोष जागीच जिरवावा लागला. तर उबाठा गटाचे नप अध्यक्षाचे उमेदवार विजयी झाले, मात्र सहाच नगरसेवक निवडून आले. आता आपण करणार तरी काय, असे म्हणत त्यांनीही आपल्या जल्लोषावर पाणी फेरले. दुसरीकडे 25 वर्षांनंतर भाजपाचा एक उमेदवार निवडून आल्याने भाजपाकडून ‘डिजे’ लावून जल्लोष करण्यात आला.
नगर परिषद निवडणूक पूर्ण बहुमताने निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्षाने साम, दाम, दंड, भेदची नीती आखली. तसे दिग्गज उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरवले. ते सर्वच पक्षावर भारी ठरलेत, पूर्ण पॅनलला समसमान मतदान मिळाले. मात्र केवळ 62 मते कमी मिळाल्याने नप अध्यक्ष उमेदवाराला पराजय स्वीकारावा लागला. याच अपयशाने शिवसेना विजयी उमेदवार, पदाधिकाèयांसह कार्यकर्ते हतबल झाल्याचे दिसून आले.
उबाठा शिवसेना Digras municipal election गटात नप अध्यक्ष उमेदवार निवडून आल्यावरही निरुत्साह दिसला. कारण केवळ सहाच नगरसेवक उमेदवार निवडून आले. या निवडणुकीत अनेक भरवशाचे उमेदवार हरल्याने त्यांनीही विजयी जल्लोष टाळला. नगर परिषद सभागृहात नगराध्यक्षासह 6 नगरसेवक उबाठा गटाचे, 16 नगरसेवक शिवसेनेचे, 1 भाजपाचा, 1 एमआयएमचा व 1 अपक्ष मिळून 25 जण विराजमान होणार आहेत.
त्यांचे संख्याबळ पाहता शहराचा विकास कसा व कोणी करायचा हा मोठा विषय आहे. शिवसेनेचे या विभागाचे आमदार तथा पालकमंत्री संजय राठोड यांना या निकालाच्या परिणामाचे चिंतन करण्याची वेळ आली आहे. तर उबाठा गटाचे खासदार संजय देशमुख हे नगराध्यक्ष व 6 नगरसेवकांना घेऊन समाधानी नाहीत अशी स्थिती नगर परिषद निवडणुकीच्या अनपेक्षित निकालाने करुन ठेवली आहे. ‘मतदात्यां’नी दिलेल्या कौलाने दोघेही दिग्गज हतबल झाल्याचे दिसून येत आहेत.