नाविन्यपूर्ण योजनेतून राबविण्यात येणार्‍या उपक्रमांची प्रचार, प्रसिद्धी करण्यात क्रीडा विभाग अपयशी

22 Dec 2025 21:11:35
रवींद्र तुरकर
 
गोंदिया, 
 
gondia-sports-bems गोंदियासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांत जिल्हा नियोजन समिती (डीपीडी) च्या माध्यमातून दरवर्षी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. क्रीडा विभागालाही डीपीडीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत उपक्रम राबविण्यासाठी कोट्यवधीचा निधी दिला जातो. महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण 2012 अंतर्गत जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनाअंतर्गत युवक कल्याण कार्यक्रम म्हणून स्पर्धा परीक्षा अनुदान सुद्धा दिले जाते. परंतु, या अंतर्गत राबविण्यात येणार्‍या उपक्रमाची कुठेही प्रचार, प्रसिद्धी न करता क्रीडा विभागाने अत्यंत गोपनियता राखत उपक्रम राबविल्याचे समोर आले आहे. या योजनेतच संपूर्ण राज्यात मोठा गैरप्रकार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
 
 

gondia-sports-bems 
 
 
 
gondia-sports-bems नाविन्यपूर्ण योजनाअंतर्गत युवक कल्याण कार्यक्रम राबविण्यात आलेल्या उपक्रमाची क्रीडा विभागाच्या वेबसाईटवर कुठलीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही त्यामुळे या उपक्रमाअंतर्गत जिल्हानिहाय राज्यात नेमके कोणते उपक्रम राबविले गेले. या उपक्रमाचे लाभार्थी कोण? ज्यांना या उपक्रमाबद्दल माहित आहे तेच सर्व जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेतात का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. मागील तीन वर्षाचा आढावा घेतला असता शासनाच्या बीम्स (बीईएमएस) प्रणालीवर उपलब्ध माहितीनुसार राज्यात नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत उपक्रम राबविण्यासाठी जिल्हानिहाय कोट्यवधीचा निधी डीपीडीच्या माध्यमातून उपलब्ध करून  देण्यात आला आहे.
 
 
 
gondia-sports-bems मात्र, या योजनेची क्रीडा विभागाने कोणतीही प्रसार, प्रसिद्धी न करताच संबंधित संस्थांना निधी दिला गेला आहे. क्रीडा विभागाने जिल्हा स्तरावरुन योजनेची फलनिष्पत्ती आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असा सूर जनसामान्यातून उमटत आहे. वर्ष  2022-23 पासून 2024-25 पर्यंत दिलेल्या निधीचा आकडा वाढत आहे. मात्र, या निधीतून राबविण्यात आलेले उपक्रम कोणते, याची माहिती त्या-त्या जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेला नाही. अशी माहिती क्रीडा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध नाही. शासनाच्या ‘प्रशासनात पारदर्शकता’ संकल्पनेला क्रीडा विभाग छेद देत असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.
Powered By Sangraha 9.0