मयमनसिंगचे औद्योगिक क्षेत्राचे पोलिस अधीक्षक मोहम्मद फरहाद हुसेन खान यांनी सांगितले की, घटनेची माहिती रात्री सुमारे ८ वाजता मिळाली. पोलिस तातडीने घटनास्थळी रवाना झाले, मात्र तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेली होती. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता आणि ढाका मयमनसिंग महामार्गावर सुमारे १० किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे मदतकार्याला अडथळे आले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कारखाना व्यवस्थापन पोलिसांच्या संपर्कात असतानाही कोणत्याही अधिकाऱ्याने वेळेवर मदतीसाठी संपर्क साधला नाही. कारखान्याचे कार्यालय घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर असताना देखील उशीर झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
दरम्यान, कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी काही कामगारांनी दीपूवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला आणि आरोपांना कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले. तरीही कामगारांचा संताप कमी झाला नाही. प्रकरण कारखान्याच्या अंतर्गत पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे पोलिसांना कळवण्यास विलंब झाला, असा दावा व्यवस्थापनाने केला आहे.
रात्री शिफ्ट बदलाच्या वेळी जमाव आणखी वाढला. अखेर सुमारे ९:४५ वाजता संतप्त जमावाने कारखान्याचा दरवाजा तोडून आत घुसून दीपूला सुरक्षा कक्षातून बाहेर खेचले.deepu murder case त्यानंतर त्याच्यावर अमानुष हल्ला करण्यात आला. स्थानिक जमावही हल्ल्यात सामील झाला आणि दीपूची जागीच हत्या करण्यात आली. नंतर मृतदेह जाळण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
रॅपिड अॅक्शन बटालियन (RAB) आणि पोलिसांच्या तपासात दीपूने सोशल मीडियावर कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा पुरावा सापडलेला नाही. त्यामुळे ईश्वरनिंदेचा आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली असून, मृताच्या भावाने १४० ते १५० अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.