माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे दीर्घ आजाराने निधन

22 Dec 2025 18:36:36
तभा वृत्तसेवा वणी,
Vishwas Nandekar, वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेना नेते विश्वास रामचंद्र नांदेकर यांचे रविवार, 21 डिसेंबरला रविवारी रात्री 11.05 वाजता मुंबईतील लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच वणी तालुका आणि संपूर्ण विधानसभा क्षेत्रात शोककळा पसरली.विश्वास नांदेकर यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद सदस्यापासून सुरु झाला होता. 2004 ते 2009 या काळात ते वणीचे आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचे यवतमाळ जिल्हा प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. संघटनेवर मजबूत पकड, प्रशासनावर वचक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव झटणारी नेतृत्वशैली यामुळे ते लोकप्रिय होते.
 

Vishwas Nandekar, 
सामाजिक मुद्यांवर ठाम भूमिका घेणारे आणि कार्यकर्त्यांशी जवळीक सांभाळणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. दीर्घ आजाराने त्यांना गेल्या काही महिन्यांत त्रास सहन करावा लागला होता. दोन महिन्यांपूर्वी गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती आणि गेल्या महिन्याभरापासून मुंबईत उपचार सुरु होते.त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या जाण्याने कार्यकर्ते आणि समर्थकांना धक्का बसला आहे.त्यांचे पार्थिव मुंबईहून वणीला आणून अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यांच्यावर मूळगाव पठारपूर मंगळवार, 23 डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात येेणार आहे.
Powered By Sangraha 9.0