नवी दिल्ली,
Ajit Pawar is with Maha Vikas Aghadi राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याने सर्व पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय हालचालींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण येथे अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही राष्ट्रवादींची मजबूत पकड असून, दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
पुण्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची आघाडी उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संभाव्य आघाडीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबतच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही सहभागी करून घेण्याचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रस्ताव थेट अजित पवार यांच्यासमोर मांडला जाणार असल्याने, ते महाविकास आघाडीच्या दिशेने झुकतात का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे संकेतही मिळत आहेत. येत्या २५ किंवा २६ तारखेला पुण्यातील आघाडीची औपचारिक घोषणा केली जाईल, अशी माहिती अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्यात भाजपविरोधात मोठी एकजूट उभी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र, या संभाव्य एकत्रीकरणाला पक्षांतर्गत विरोधही समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आपण पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शरद पवार गटासमोर नवे आव्हान उभे राहिले असून, या मतभेदांवर तोडगा कसा काढला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मुंबई प्रदेश बैठक आज दुपारी होणार आहे. या बैठकीत सुप्रिया सुळे, मुंबई प्रदेशाध्यक्षा राखी जाधव आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वतीने आलेल्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेऊन तो आजच अधिकृतपणे कळवला जाण्याची शक्यता आहे. सध्या चर्चेच्या फेऱ्या सुरू असून, संवादातून योग्य मार्ग निघेल, असा विश्वास शरद पवार गटाने व्यक्त केला आहे.