अंबाझरी जैवविविधता उद्यानात चिमुकल्यांनी जोडले निसर्गाशी नाते

23 Dec 2025 14:29:44
नागपूर,
ambazari biodiversity park लहान मुलांमध्ये निसर्गाबद्दल जिव्हाळा निर्माण करण्यासाठी वाईल्ड अजाईल फाऊंडेशनच्या पुढाकाराने अंबाझरी जैवविविधता उद्यानात विशेष नेचर वॉकचे आयोजन करण्यात आले. नागपूर वन विभाग (प्रादेशिक) व महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या सहकार्याने रविवार दिनांक २१ डिसेंबर रोजी हा उपक्रम उत्साहात पार पडला. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या निसर्गभ्रमंतीला शहरातील नागरिकांनी आपल्या मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
 
 

ambazari park 
 
 
शहराच्या गजबजाटातून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा अनुभव पालक व मुलांसाठी अविस्मरणीय ठरला. या नेचर वॉकदरम्यान जैवविविधता म्हणजे काय, ती मानवजीवनासाठी का महत्त्वाची आहे, याची माहिती देण्यात आली. अंबाझरी उद्यानातील विविध मातीचे प्रकार, गवत, वृक्ष, कीटक, पक्षी व इतर जीवसृष्टी यांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. मुलांना निसर्ग फक्त पाहता यावा इतकेच नव्हे, तर तो समजून घेता यावा, या हेतूने रंजक व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. प्राण्यांच्या पावलांचे ठसे ओळखणे, ठशांनुसार प्राण्यांच्या चित्रांची जुळवणी करणे, तसेच गळून पडलेली पाने, फुले, बिया यांचा वापर करून मनगटी पट्टी तयार करणे या उपक्रमांना मुलांचा विशेष प्रतिसाद मिळाला. जगाच्या नकाशावर खंडनिहाय प्राणी ओळखण्याचा उपक्रमही आकर्षण ठरला. यावेळी वनपाल सुनील फुलझेले यांनी अंबाझरी तलावातील पाणथळीबाबत माहिती दिली. उप वनसंरक्षक डॉ. विनिता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.ambazari biodiversity park वाईल्ड अजाईल फाऊंडेशनचे प्रफुल देशमुख, दीप्ती पंडे, स्मृती चोबितकर व पराग चोबितकर यांच्या परिश्रमातून हा उपक्रम यशस्वी झाला. सहभागी पालकांनी अशा निसर्गपूरक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0