चांदूर रेल्वेतील मीरा इंडस्ट्रीजला आग

23 Dec 2025 19:58:13
चांदूर रेल्वे, 
meera-industries-fire : शहरालगत असलेल्या कुर्‍हा रोडवरील एमआयडीसी परिसरातील मीरा इंडस्ट्रीज या चणाडाळ प्रक्रिया करणार्‍या मोठ्या मिलमध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात चणाडाळ, चणा, कुटार तसेच मिलमधील महागडी यंत्रसामग्री जळून खाक झाली असून उद्योगाला मोठ्या आर्थिक नुकसानीचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 

fire 
 
मीरा इंडस्ट्रीजमध्ये दररोज सुमारे ७० टन चण्यावर प्रक्रिया करून चणाडाळ निर्मिती केली जाते. जवळपास दोन ते अडीच एकर परिसरात पसरलेली ही इंडस्ट्री तीन मजली इमारतीत कार्यरत असून, त्यामुळे आगीचे स्वरूप अधिकच भीषण झाले. आगीचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारी रात्री दहापर्यंत मिलमध्ये नियमित कामकाज सुरू होते. काम संपल्यानंतर मजूर व मालक घरी निघून गेले होते, मात्र काही मजूर मिल परिसरातील निवासस्थानी झोपले होते. थंडीचे दिवस आणि मध्यरात्र असल्यामुळे आग नेमकी केव्हा लागली याची कोणालाही चाहूल लागली नाही. मंगळवारी सकाळी मिलमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच मालक पियुष गंगन व सचिन गंगन यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. तात्काळ मिलचे शटर उघडताच आत अग्नीचे रौद्र रूप पाहायला मिळाले आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले.
 
 
//अग्निशामक दलाचे अथक प्रयत्न
 
 
चांदूर रेल्वे, धामणगाव, नांदगाव खंडेश्वर, तिवसा व अमरावती येथील अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. गाड्यांच्या ३० ते ३५ फेर्‍या झाल्या. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ पर्यंतच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या मोहिमेत अग्निशामक विभागाचे प्रमुख अमोल भुजाडे, लिपीक जितू कर्से, कर्मचारी पंकज इमले, वाहन चालक अमोल कडू, फायरमन निरज दुबे, मयूर घोडेस्वार अन्य ठिकाणच्या कर्मचार्‍यांनी मोलाची भूमिका बजावली.
Powered By Sangraha 9.0