मयत वनपट्टेधारक शेतकर्‍यांचे नाव कमी करा

23 Dec 2025 18:29:29
कुरखेडा, 
chandrashekhar-bawankule : मयत वनपट्टेधारक शेतकर्‍यांचे नाव कमी करून वारसदारांचे नावाने त्वरित सातबारा फेरफार करण्यात यावे, या मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत नागीलवार, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उल्हास देशमुख, युवा कार्यकर्ते गुलाब मस्के व पदाधिकारी उपस्थित होते.
 
 

gad
 
गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा असून जिल्ह्यातील तसेच कुरखेडा तालुक्यातील अनेक नागरिक शेती व्यवसायावर आपली उपजीविका करीत आहेत. यात कुरखेडा तालुक्यातील आंधळी नवरगाव, बेलगाव, खैरी, वाघेडा, गेवर्धा, खेडेगाव, गोठणगाव, देऊळगाव व कुरखेडा तालुक्यातील अनेक गावातील मयत वनपट्टेधारक शेतकरी यांच्या वारसदारांनी सातबारा फेरफार करण्यासंदर्भात संबंधित विभागाकडे आवश्यक कागदपत्रसह अर्ज सादर केले आहे. मात्र अनेक महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा अद्यापही मयत शेतकरी बांधवांचे सातबारावर वारसदारांचे नाव चढविण्यात आले नाही. त्यामुळे ते विविध योजनेपासून वंचित राहत आहेत. या संदर्भात चांगदेव फाये यांनी राज्याचे वनमंत्री बावनकुळे यांच्याकडे निवेदन सादर करून प्रश्‍न निकाली काढण्याची मागणी केली आहे.
 
 
मयत वनपट्टेधारक शेतकरी बांधवांच्या सातबारावर वारसदारांचे नाव न चढवल्यामुळे संबंधित शेतकर्‍यांना शासकीय योजनेपासून लाभ घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अनेक योजनेपासून ते वंचित राहत आहेत. शासकीय धान खरेदी योजना धान विक्री करण्यासंदर्भात नावाची नोंदणी करणे तसेच पीक कर्ज उचल करण्यास वंचित राहत आहे. त्यामुळे या संदर्भात योग्य उपाययोजना करून मयत वनपट्टेधारक शेतकर्‍यांचे नाव कमी करून वारसदारांच्या नावाने सातबारा फेरफार करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी चांगदेव फाये यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0