मुख्यमंत्री फडणवीसांचा भाजपा नेत्यांना कडक इशारा!

23 Dec 2025 12:36:58
मुंबई,
Fadnavis issues a stern warning महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने प्रभावी कामगिरी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील नेत्यांना स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या आहेत. महायुतीतील घटक पक्षांबाबत संयम राखण्याचा सल्ला देत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मित्रपक्षांवर सार्वजनिक टीका किंवा हल्ले करू नयेत, असे ठामपणे सांगितले आहे. नागरी निवडणुकांमध्ये भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरले होते. काही ठिकाणी परस्परविरोधी लढती झाल्या असल्या तरी हे तिन्ही पक्ष महायुतीचा भाग असल्याने निवडणुकीनंतर समन्वय राखणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
 

fadnavis 
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक निकालांचा आढावा घेण्यात आला. भाजपने अनेक ठिकाणी वर्चस्व राखले असले, तरी काही जागांवर अपेक्षित यश न मिळाल्याची कबुली देत फडणवीस यांनी पक्ष आणखी चांगली कामगिरी करू शकला असता, असे मत व्यक्त केले. निवडणूक काळात किंवा त्यानंतर कोणत्याही भाजप नेत्याने मित्रपक्षांविरोधात आक्रमक भूमिका घेऊ नये. महायुतीची एकजूट टिकवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
 
आतापर्यंत महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मिळून २८८ जागांवर विजय मिळवला असून, महाविकास आघाडीला केवळ ४४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. आता राजकीय वर्तुळाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले असून, १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीतील समन्वय आणि शिस्त कायम ठेवण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष भर दिला आहे.
Powered By Sangraha 9.0