वाहनातून मध्यप्रदेशातून दारूची अवैध तस्करी; आरोपी फरार

23 Dec 2025 19:08:39
गोंदिया, 
illegal-liquor-smuggling : आगामी सण-उत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करांविरुद्ध कंबर कसली आहे. सापळा रचून राज्य उत्पादन विभागाने मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारी विदेशी दारू आणि एक कार असा ११ लाख ३२ हजार १०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रविवार २१ डिसेंबर रोजी आमगाव तालुक्यातील बाम्हणी रेल्वे फाटकाजवळ करण्यात आली.
 

illegal-liquor-smuggling 
 
 
 
मध्य प्रदेशातून एका पांढर्‍या रंगाच्या वाहन क्रमांक सीजी ०८, एलएन २५२० मधून विदेशी दारूची तस्करी केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. माहितीच्या आधारे देवरी आणि गोंदिया येथील पथकाने बाम्हणी रेल्वे फाटकाजवळ नाकाबंदी केली. संशयित वाहन येताच त्याची झडती घेतली असता, त्यात केवळ मध्यप्रदेशात विक्रीसाठी असलेल्या विविध नामांकित कंपन्यांच्या दारूचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत पथकाने महिंद्रा एक्सयुव्ही ५०० वाहन किंमत ८ लाख ५० हजार, गोवा व्हिस्की, रॉयल स्टॅग, मॅकडॉवेल नंबर १, ओल्ड मंक रम आणि किंगफिशर बिअरच्या अशा १५०० हून अधिक बाटल्या व कॅनचा किमत अंदाजे २.८० लाख रुपये व इतर साहित्यामयध्ये जिओ भारत मोबाईल, ३ एटीएम कार्ड आणि रोख रक्कमेचा समावेश आहे. प्रकरणातील मुख्य सूत्रधार नितीन निर्मल धमगाये हा कारवाई दरम्यान फरार झाला.
 
 
राज्य उत्पादन शुल्क विभागाने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, विभागीय उपायुक्त गणेश पाटील आणि अधीक्षक मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनात देवरीचे निरीक्षक अ. ओ. गभणे, दुय्यम निरीक्षक ए. ए. सडमेक, आर. एम. आत्तेलवाड आणि भरारी पथक गोंदियाच्या कर्मचार्‍यांनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास दुय्यम निरीक्षक ए. ए. सडमेक करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0