ढाका,
Journalists are unsafe in Bangladesh बांगलादेशात माध्यमांवर होत असलेल्या वाढत्या हल्ल्यांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा पत्रकारांचे जीव सुरक्षित राहणे हीच आता सर्वात मोठी चिंता बनली आहे, अशी तीव्र भावना देशातील आघाडीच्या वृत्तपत्रांच्या संपादकांनी व्यक्त केली आहे. ढाका येथे सोमवारी माध्यम क्षेत्रातील वरिष्ठांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बांगलादेशातील पत्रकारिता सध्या केवळ दबावाखाली नाही तर थेट अस्तित्वाच्या लढाईला सामोरी जात आहे. ढाकामधील ‘प्रथम आलो’ आणि ‘द डेली स्टार’ या दोन नामांकित वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर जमावाने केलेल्या हिंसक हल्ल्यानंतर या प्रतिक्रिया उमटल्या. युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येच्या बातम्यांनंतर गुरुवारी रात्री संतप्त जमावाने या दोन्ही वृत्तपत्रांच्या इमारतींमध्ये तोडफोड करत आग लावली. या हल्ल्यामुळे अनेक पत्रकार आणि कर्मचारी अनेक तास इमारतींच्या आत अडकून पडले होते. परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असताना नंतर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली.

‘द डेली स्टार’चे संपादक आणि प्रकाशक महफुज आनंद यांनी सांगितले की, हा हल्ला केवळ वृत्तपत्रांविरोधातील निषेध नव्हता, तर पत्रकार आणि कर्मचाऱ्यांच्या जीवावर थेट उठलेला हल्ला होता. इमारतींना आग लावण्यापूर्वी हल्लेखोरांनी आत अडकलेल्या पत्रकारांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी दिली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘द डेली स्टार’च्या इमारतीच्या छतावर तब्बल २६ ते २७ माध्यम कर्मचारी अडकले होते आणि काही काळ अग्निशमन दलालाही त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले गेले नाही. या प्रकरणात ढाका महानगर पोलिसांवरही टीका झाली असून, पोलिसांनी मात्र आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. पोलिस आयुक्त नजरुल इस्लाम यांनी सांगितले की, त्या क्षणी तातडीची कारवाई केल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता होती. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी संयमाने पावले उचलावी लागली, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने या हिंसाचारावर प्रतिक्रिया देत सांगितले की, वृत्तपत्रे आणि सांस्कृतिक संस्थांवर झालेल्या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘प्रथम आलो’, ‘द डेली स्टार’ तसेच छायानौत आणि उदीची शिल्पी गोष्ठी या सांस्कृतिक संघटनांच्या कार्यालयांवर हल्ले करण्यात आले होते. हल्लेखोरांनी या संस्थांवर भारताचे हित जपल्याचा आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून हटवण्याचा आरोप करत घोषणाबाजी केल्याचेही समोर आले आहे. बांगलादेशातील हा ताजा हिंसाचार युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर घडला आहे. ३२ वर्षीय हादी हे गेल्या वर्षी झालेल्या लोकशाही समर्थक आंदोलनातील एक प्रमुख चेहरे होते. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ते उमेदवार होते. मात्र, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची हत्या केल्यानंतर देशभरात हिंसाचाराची लाट उसळली. या घटनेनंतर अवामी लीगशी संबंधित नेते, समर्थक तसेच अल्पसंख्याक समुदायांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने बांगलादेशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अधिकच अस्थिर बनली आहे.