हमीभाव केंद्रावरच कापूस विक्री करा : अतुल गण्यारपवार

23 Dec 2025 18:17:53
गडचिरोली, 
atul-ganyarpawar : केंद्र शासनाच्या भारतीय कपास निगम (सीसीआय) अंतर्गत सुरू असलेल्या हमीभाव कापूस खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी आपला कापूस केवळ शासकीय हमीभाव केंद्रावरच विक्री करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक तथा माजी कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले आहे.
 
 
atul
 
कापूस विक्रीसाठी ‘कपास किसान अ‍ॅप’वर नोंदणी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे सहा हजार कापूस उत्पादक शेतकरी असून आतापर्यंत केवळ 1702 शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1218 शेतकर्‍यांचे अलॉटमेंट पूर्ण झाले असून, अनेक शेतकर्‍यांनी अद्याप संपूर्ण कागदपत्रे अपलोड न केल्याने ते हमीभाव विक्रीपासून वंचित राहिले आहेत.
 
 
खाजगी व्यापारी 6500 ते 7000 रुपये प्रति क्विंटल दर देत असताना, शासनाकडून मध्यम धाग्यासाठी 7710 व लांब धाग्यासाठी 8110 रुपये प्रति क्विंटल दर दिला जात आहे. वाहतूक खर्च वजा जाता शेतकर्‍यांना शासनाच्या केंद्रावर अधिक फायदा होत असल्याचे गण्यारपवार यांनी सांगितले. नोंदणीस अडचण असल्यास शेतकर्‍यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा येथे संपर्क साधावा. जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील जिनिंग केंद्रांवर शासकीय हमीभावाने कापूस खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खाजगी व्यापार्‍यांकडे कापूस विक्री टाळून शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0