वर्धा,
new-english-high-school : वर्धा एज्युकेशन सोसायटी अंतर्गत स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेच्या खरे सभागृहात रविवार २१ रोजी आयोजित माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. तब्बल २७ वर्षांनंतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी एकत्र आल्याने शाळेचा परिसर आठवणी आणि आनंदाने उजळून गेला होता. केवळ स्नेहसंमेलन न करता, सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून गरजू विद्यार्थ्यांना सायकल प्रदान सोहळा पार पडला.

माजी विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा दुवा साधणे, त्यांच्या अनुभवांचे आदान-प्रदान करणे, शाळेच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान मिळवणे आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश होता. शाळेच्या १९९८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र आले. त्यांनी केवळ स्नेहसंमेलन न करता या सोहळ्याला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना सायकल प्रदान करण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश आयोजकांनी ठेवला होता. या संमेलनाला १९९८-९९ च्या बॅचचे आणि इतर अनेक वर्षांचे सुमारे २५० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते. काही माजी विद्यार्थी परदेशातून खास या सोहळ्यासाठी वर्धेत आले होते.
कार्यक्रमाची सुरूवात रंगमंदिर परिसरात शाळेची प्रार्थना आणि राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर खरे सभागृहात शाळेच्या शिक्षकांचे आदरपूर्वक स्वागत आणि दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक विजय जुगनाके यांनी अध्यक्षपद भूषविले. व्यासपीठावर १९९८ वर्षाचे वर्गशिक्षक भालशंकर, काळे व श्रीमती नगराळे उपस्थित होते. त्यावर्षी विविध विषय शिकवणारे शिक्षक काण्णव, टोळ, नगराळे, गुजर, येते, घनोकार, कुलकर्णी, महाजन, साने, तिवारी, फरकाडे, शिक्षकेतर कर्मचारी बोराडे, वानखेडे, उमाटे, शहाकार यांची विशेष उपस्थिती होती.
स्वागत गीत, प्रास्ताविक, विविध समित्यांची ओळख व विविध विद्यार्थी प्रतिनिधींनी मनोगत मांडले. त्यानंतर दिवंगत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुढील सत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक जुगनाके यांनी, भविष्यात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवता येईल व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येवून संघटित होऊन कार्य करण्याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही शालेय जीवनातील गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेने दिलेल्या संस्कारांबद्दल मनमोकळेपणाने विचार मांडले.
शाळेच्या बाकावर पुन्हा बसून, जुन्या मित्रांसोबत गप्पा मारताना आम्ही पुन्हा एकदा विद्यार्थी झालो होतो, अशी प्रतिक्रिया एका माजी विद्यार्थ्याने व्यत केली. स्नेहभोजन आणि सामूहिक छायाचित्रणाने कार्यक्रमाची सांगता झाली. यशस्वीततेसाठी सर्व समिती सभासदांनी व इतर सर्व वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.