तिवसा,
seismograph बर्याच प्रयत्नानंतर अखेर कोल्हापूर येथील भूकंपमापक यंत्र शिवणगाव परिसरात बसविण्याचा निर्णय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने घेतला असून पुन्हा एकदा सूक्ष्म सर्वेक्षण केले जाणार आहे. तिवसा तालुक्यातील शिवणगाव हे गाव गेल्या काही महिन्यांपासून भूकंपसदृश धक्क्यांचे केंद्रबिंदू ठरत आहे. शिवणगावसह लगतच्या फत्तेपूर, शेंदोळा खुर्द व शिरजगाव या गावांनाही सातत्याने जमिनीतून येणारे आवाज व धक्के जाणवत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्येक वेळी भूकंपासारखे धक्के जाणवताच तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयास तात्काळ माहिती देण्यात येत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागास याबाबत अवगत केले. त्यानुसार या विभागाची चमू दोन वेळा शिवणगाव परिसरात तपासणीसाठी दाखल झाली होती. विविध ठिकाणी पाहणी करून जमिनीतील बदलांचा अभ्यास करण्यात आला; मात्र पहिल्या पाहणीचा अहवाल तब्बल एक महिन्यानंतर देण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली. यानंतर तातडीने पुन्हा नव्याने सर्वेक्षणासाठी दुसरी चमू पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ती चमू शिवणगावात दाखलही झाली.seismograph या चमूने भूकंपमापक यंत्र बसविण्याचे आश्वासन दिले होते; मात्र आजतागायत ते प्रत्यक्षात उतरले नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीदेखील परिसरात पुन्हा धक्के बसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.
या पृष्ठभूमीवर सोमवार, २२ डिसेंबर रोजी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अप्पर महानिदेशकांना भूकंपमापक यंत्र तातडीने बसविण्याबाबत लेखी निवेदन माजी जि.प. सदस्य संजय देशमुख यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले. यानंतर नागपूर येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण कार्यालयात अप्पर महानिदेशक दिनेश गणवीर, संचालक श्रीनिवास व शशांक रंगारी यांच्यासोबत सुमारे एक तास सविस्तर बैठक पार पडली. या बैठकीत अप्पर महानिदेशकांनी शिवणगाव परिसरातील सर्व गावांचे पुन्हा सूक्ष्म सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले, तसेच सध्या कोल्हापूर येथे कार्यरत असलेले भूकंपमापक यंत्र शिवणगाव येथे स्थलांतरित करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.