काबूलवर बॉम्ब टाकता, मग भारतावर आक्षेप का?

23 Dec 2025 16:11:37
इस्लामाबाद,
The question of Pakistani clerics पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडवणारे वक्तव्य करत जमियत उलेमा-ए-इस्लाम (फझल) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना फजलुर रहमान यांनी थेट पाकिस्तानी लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कराचीतील लियारी भागात झालेल्या तहफुज दीनिया मदारीस परिषदेत बोलताना त्यांनी भारताने बहावलपूर आणि मुरीदके येथे केलेल्या कारवाईवर पाकिस्तानकडून घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फजलुर रहमान म्हणाले की, जर पाकिस्तान स्वतः शत्रूच्या तळांवर हल्ले करण्याचे समर्थन करत असेल, तर भारताने काश्मीरमधील हल्ल्यांमागील केंद्रांवर कारवाई केली तर ती चुकीची कशी ठरवता येईल? पाकिस्तान आपल्या कारवायांना योग्य ठरवत असताना भारताच्या कृतींवर आक्षेप घेणे हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर पाकिस्तान अफगाणिस्तानातील कारवायांचे समर्थन करू शकतो, तर भारताच्या कारवाईवर टीका करण्याचा नैतिक अधिकार पाकिस्तानला कसा काय मिळतो?
 

Senior cleric Maulana Fazlur Rehman 
 
अफगाणिस्तानविषयक धोरणावरही त्यांनी लष्करप्रमुखांना आरसा दाखवला. काबूलवर होणाऱ्या हल्ल्यांची तुलना त्यांनी इस्लामाबादवर होणाऱ्या हल्ल्यांशी करत तालिबान अशा कारवाया कशा सहन करतात, असा थेट सवाल केला. पाकिस्तानला नेहमीच अफगाणिस्तानात आपल्याला अनुकूल सरकार हवे असते, मात्र झहीर शाहांपासून ते अशरफ घनीपर्यंत कोणतेही अफगाण सरकार पाकिस्तानसमर्थक नव्हते, उलट भारताकडे झुकलेले राहिले, असेही त्यांनी नमूद केले. पाकिस्तानच्या ७८ वर्षांच्या अफगाण धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे सांगत, आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देतो, पण स्वतःच्या धोरणातील अपयश मान्य करण्याची तयारी दाखवत नाही, अशी टीकाही फजलुर रहमान यांनी केली. मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका मांडली. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर मोठी कारवाई केली होती. ६ मेच्या रात्री भारतीय लष्कराने नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी ठरला नव्हता. या संपूर्ण पार्श्वभूमीवर मौलाना फजलुर रहमान यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानातील लष्कर आणि राजकीय नेतृत्वातील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0