वेध. . .
विजय कुळकर्णी
lonar lake बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगविख्यात खाऱ्या पाण्याच्या सरोवरातील जलस्तर सध्या वाढत आहे. त्यामुळे सरोवरातील पुरातन हेमाडपंथी मंदिर व जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. यामुळे पर्यावरणवाद्यांची चिंता वाढली आहे. हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर निर्माण झाले आहे. बेसाल्ट खडकामध्ये असलेल्या व खाऱ्या पाण्याचे म्हणून हे सरोवर जगातील अभ्यासकांचे आकर्षण आहे. देश-विदेशातील वैज्ञानिक व अभ्यासक लोणार येथे या सरोवराचा अभ्यास करण्यासाठी येतात. दरवर्षी मोठ्या संख्येत पर्यटक देखील भेट देतात. विशेष म्हणजे खाऱ्या पाण्याचे हे एकमेव सरोवर आहे. त्याच्या परिसरात 12 प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आहेत. कमळजा देवीचे मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या काही वर्षांपासून या सरोवरातील जलस्तर वाढत आहे. पाण्याची पातळी वाढल्याने कमळजा देवीचे मंदिर जवळपास 15 फूट पाण्यात बुडाले आहे. सरोवरातील वाढती पाण्याची पातळी हा पर्यावरणवादी, अभ्यासक आणि नागरिकांचा चिंतेचा विषय ठरत आहे. कारण, यापूर्वी सरोवरातील पाण्याची पातळी कधीच वाढत नव्हती. मंदिर यापूर्वी कधीच पाण्यात बुडाले नव्हते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
पाण्याची पातळी वाढण्याचे नेमके कारण आजपर्यंत स्पष्ट झालेले नाही. याविषयी लोणार येथील सुधाकर बुगदाणी व खामगाव येथील सुप्रसिद्ध छायाचित्रकार अशोक खेकाळे यांनी सरोवराच्या जलस्तर वाढीबाबत शासन व पुरातत्त्व विभागाकडे अनेक निवेदन दिली होती. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. सरोवराच्या वर पाझर तलाव व जलसंवर्धनाची कामे झाल्याने सरोवरातील झरे जिवंत होऊन जलस्तर वाढत असल्याचे निरीक्षण या दोघांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, त्याकडे लक्ष देण्यास शासनाला कधी वेळ मिळाला नाही. अशोक खेकाळे यांची मुलगी अॅड. कीर्ती निपाणकर यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, सुधाकर बुगदाणी आणि अशोक खेकाळे यांचे निधन झाल्याने हा संघर्ष अर्ध्यावरच थांबला. आता पुन्हा सरोवरातील जलस्तरात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे पर्यावरणवादी व नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत आणि त्यांनी हा धोका टाळण्यासाठी तातडीने जलस्तर वाढीचे कारण शोधून त्यावर नियंत्रण मिळविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, नागपूरचे अधीक्षक अरुण मलिक यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, जलस्तर वाढण्याचा शोध घेतला असता त्यात असे दिसले की, सरोवराच्या आजूबाजूला संरक्षित वनक्षेत्राचा झालेला विकास व वृक्षारोपण वाढल्यामुळे सूक्ष्म पर्यावरणात बदल झाला आहे. त्यामुळे परिसरात जलसंधारण क्षमतेत वाढ झालेली असावी. त्यांनी असेही सांगितले की, पुरातत्त्व विभाग कमळजा देवी मंदिराच्या चोहोबाजूने संरक्षक भिंत व चबुतरा उभारण्याची योजना तयार करीत आहे. त्यामुळे जलस्तर वाढला तरीही सर्व मंदिरे सुरक्षित राहतील व भाविकांना मंदिरात जाता येईल. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी सांगितले की, सरोवरातील पाणी बाहेर काढण्यासाठी किंवा वाहून जाण्याचा कोणताही मार्ग नाही आणि नैसर्गिक झऱ्यांतून पाण्याचा ओघ सुरू असल्यामुळे सातत्याने सरोवरातील जलस्तर वाढत आहे.lonar lake तसेच, काही वर्षांपासून लोणार व परिसरात पर्जन्यमानात मोठा बदल झाला आहे. यावर्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. आयआयटी, मुंबईच्या तज्ज्ञांनी नमुने घेतले असून जलस्तर वाढण्याच्या कारणांचा ते शोध घेत आहेत. हा नैसर्गिक बदल का होत आहे ? याचा पर्यावरणावर काय प्रभाव पडेल? यावर त्यांचे संशोधन सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे असले तरी, लोणार सरोवराचे रक्षण होणे अत्यंत आवश्यक आहे. सरोवरातील या नैसर्गिक बदलात कोणताही मानवीय हस्तक्षेप नाही. मग हा बदल का व कसा होत आहे? याचे उत्तर शोधून त्यावर उपाय करणे हे संशोधक व वैज्ञानिकांसमोरील मोठे आव्हान आहे. या जागतिक व नैसर्गिक वारशाचे संरक्षण झाले पाहिजे, अशी पर्यावरणप्रेमी व लोणारवासीयांची अपेक्षा आहे.
8806006149