कुरखेड़ा,
Tricolor insult incident : नगर पंचायत कुरखेडा प्रशासनाने कचरा गाडीत मोठ्या संख्येने तिरंगे फेकून घोर अपमान केल्याच्या प्रकरणात तीन दिवस उलटूनही दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्याने स्थानिक युवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज कुरखेड़्यातील सर्वपक्षीय युवा कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली. येत्या दोन दिवसांत कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. एकीकडे ‘हर घर तिरंगा’ अभियानाने राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढवला जात आहे, तर दुसरीकडे प्रशासकीय लापरवाहीमुळे तिरंग्याचा असा अपमान झाल्याने युवकांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला. युवकांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ लापरवाहीचा मामला नाही तर थेट राष्ट्रीय ध्वजाचा अपमान आहे, जो राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 च्या कलम 2 अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. याची शिक्षा 3 वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही असू शकते. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे राष्ट्राच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि आता युवा वर्ग हा मुद्दा सोडणार नाही, असा निर्धार व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाने अद्याप याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही, मात्र युवकांच्या या आक्रमक पवित्र्याने आता हे प्रकरण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन होईल, असा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रप्रेमी नागरिक या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत शांत बसणार नाहीत, असे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदन सादर करताना अनिकेत आकरे, ईश्वर ठाकूर, शहजाद हाशमी, दीपक धारगाये, लोकेंद्र शहा सयाम, मृणाल माकडे, प्रांजल धाबेकर, नागेश फाये, प्रशांत हटतवार, नितेश निरंकारी, आशिष तुलावी, शुभम ठाकरे, आशिष हुमने, यश सोनकुसरे, आकाश उईके, सुशील बेहेर यासह सर्वपक्षीय युवा कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.