बुलढाणा,
vasadi-primary-health-center-case : प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी येथे मुदतबाह्य नसलेली औषधे जाळल्याचे तसेच वैद्यकीय अधिकारी अनुपस्थिती प्रकरणी सक्षम प्राधिकार्यांच्या आदेशानुसार प्रत्यक्ष भेट देऊन सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात आली. या प्रकरणी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली.

प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी येथे मुदतबाह्य नसलेली औषधे जाळण्यात आल्याचा तसेच वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचा आरोप करणारी बातमी प्रसारित झाली होती. बातमीच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकार्यांच्या आदेशानुसार दि. १८ डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी येथे भेट देऊन सखोल व वस्तुनिष्ठ चौकशी करण्यात आली. चौकशीत असे आढळून आले की, प्राथमिक आरोग्य केंद्र वसाडी हे मार्च २०२४ पासून कार्यरत असून मंजूर १५ पदांपैकी २ वैद्यकीय अधिकारी कंत्राटी स्वरूपात कार्यरत आहेत व ८ पदे बाह्य स्रोताद्वारे भरलेली आहेत. काही पदे सध्या रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी सोनाळा येथे वास्तव्यास असून वसाडी येथे निवासाची सुविधा उपलब्ध नाही. ई-औषधी लॉगिन उपलब्ध नसल्यामुळे औषध पुरवठा प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा येथून ऑफलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ५,४१७ बाह्यरुग्णांनी उपचार घेतले आहेत.
चौकशीदरम्यान इंजेशन तसेच सिरप ही औषधे जाळण्यात आल्याचे निदर्शनास आले. सदर औषधांची एकूण किंमत २ हजार ५३२ रुपये असून त्यापैकी फक्त १६० रुपये किंमतीची औषधे मुदतबाह्य होती. उर्वरित औषधांच्या विल्हेवाट प्रकरणी संबंधित औषध निर्माण अधिकार्याकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माण अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून प्राप्त खुलाशांच्या आधारे पुढील प्रशासकीय कारवाई प्रस्तावित आहे. भविष्यात अशा प्रकारची चूक आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तालुकास्तरावरील नियंत्रणाबाबत वरिष्ठ स्तरावर आवश्यक ती कारवाई प्रस्तावित आहे. औषध विल्हेवाट प्रक्रियेमध्ये त्रुटी व नियंत्रणाचा अभाव आढळून आल्याने संबंधित अधिकार्यांना सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासकीय कारवाई सुरू आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली आहे.