सेलू,
farmers-dead-body : तालुक्यातील सालई (कला) शिवारात एका शेतकर्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विश्वनाथ सर्जेराव खंडाते (४५) रा. सोंडी असे मृत शेतकर्याचे नाव आहे. ही घटना सोमवार २२ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.
रविवारी सकाळी विश्वनाथ खंडाते हे पत्नीसोबत शेतात गेले होते. दोघांनी मिळून दिवसभर कापूस वेचणीचे काम केले. सायंकाळी पत्नी घरी परतली. मात्र, विश्वनाथ हे वन्यप्राण्यांपासून पिकाच्या संरक्षण करण्यासाठी शेतात थांबले. नेहमीप्रमाणे ते उशिरा घरी येईल, असे कुटुंबीयांना वाटले. मात्र, रात्र उलटूनही ते घरी परतले नसल्याने सोमवारी सकाळी कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, विश्वनाथ यांचा मृतदेह शेतात सापडला. विश्वनाथ यांच्या शरिरावर गंभीर जखमा आढळून आल्याने घातपाताची शयता वर्तविली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पंचनाम्याअंती प्रज्वल लटारे यांच्या रुग्णवाहिकेने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पुढील तपास सेलू पोलिस करीत आहे.