मुंबई,
Alert in Maharashtra राज्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवली जात आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच निफाडमध्ये किमान तापमान ५ अंशावर गेले होते. नाशिक, अहिल्यानगर, जळगाव या शहरांमध्ये तापमान खूप कमी असून महाराष्ट्रभर गारठा कायम आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये थोडासा दिलासा मिळाला होता, कारण किमान तापमान काही अंशांनी वाढले होते, मात्र पुढील २४ तासांत राज्यात थंडीच्या जोरात वाढ होणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किमान तापमान दोन ते तीन अंशांनी कमी होईल.

महाबळेश्वरमध्ये आज तापमान १२ अंश सेल्सिअस आहे. मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिकमध्ये तापमान साधारण ९ अंशांवर आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या सात दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील आणि पुढील २४ तासांत किमान तापमान २-३ अंशांनी घटेल. उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तापमान ७ ते ९ अंशांवर राहण्याची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस हवामानात फारसा बदल होणार नाही, असे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे.
सध्या उत्तरेतील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही कडाक्याची थंडी आहे. पंजाबमध्ये तापमान ५ अंशावर आहे. २७ ते २९ डिसेंबर दरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर या राज्यांना हवामान विभागाचे थंडीचे इशारे आहेत, ज्याचा महाराष्ट्रावरही परिणाम होऊ शकतो. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, जळगाव, नगर, मालेगाव, जेऊर या भागांमध्ये तापमान सध्या १० अंशापेक्षा कमी आहे. मराठवाड्यात धाराशिव १० अंशावर आणि परभणी ११ अंशावर आहे. पुढील २४ तासांत तापमान दोन ते तीन अंशांनी कमी होणार असल्याने संपूर्ण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढणार आहे.
अहिल्यानगरमध्ये तापमान ९.३, छत्रपती संभाजीनगर १२, जळगाव ९.७, कोल्हापूर १५.३, महाबळेश्वर १२, नाशिक ९.५, धाराशिव १०.४, परभणी ११, सांगली १३.२, सातारा १२.१ आणि सोलापूर १३.८ अंश सेल्सिअस आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गारठा कायम राहणार आहे. नाशिक आणि जळगावमध्ये शीतलहरींचा फटका नागरिकांना जाणवेल. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरसह काही भागांत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, किमान तापमान ९ ते ११ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे.