मग आम्ही बाहेरून आलो आहोत का!

24 Dec 2025 13:48:46
मुंबई,
Bawankule anger Thackeray's alliance मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर ठाकरे बंधू एकत्र आले असून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ही युती झाली असून मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी मतदारांनी या युतीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ही युती जाहीर होताच राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.या पार्श्वभूमीवर भाजपकडून पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना, महाराष्ट्रात भावनिक मुद्द्यांवर राजकारण चालणार नाही, मुंबईतील जनता सुजाण आहे, असे म्हटले. देवेंद्र फडणवीस हेच विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबई घडवू शकतात, असा दावा त्यांनी केला. आम्ही सगळे मराठीच आहोत, काय आम्ही बाहेरून आलो आहोत का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी महायुतीतील सर्वच घटक मराठी असल्याचे सांगितले.
 

bawankule anger  
 
बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर सावरकर आणि मराठी समाजाचा अपमान केल्याचा आरोपही केला. आतापर्यंत उत्तर भारतीयांविरोधात वक्तव्ये करून डिवचण्याचे काम करण्यात आले, गरजेनुसार भूमिका बदलल्या जातात, अशी टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड केली असून त्यांचे राजकीय अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे, असे म्हणत त्यांनी उबाठा गटावर निशाणा साधला. काही ठिकाणी निवडणूक विजयांनंतर वादग्रस्त प्रकार घडल्याचा उल्लेख करत, शिंदे गटाकडे सक्षम नगराध्यक्ष असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी कवितेच्या माध्यमातून खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मातोश्रीतील घडामोडी, पक्षावर ताबा मिळवल्याचे आरोप, पूर्वी केलेली भाषणे आणि आजची भूमिका यावर त्यांनी उपरोधिक प्रश्न उपस्थित केले आहेत. पूर्वी ज्या कारणांसाठी वेगळे झालात, आज त्याच लोकांसोबत पुन्हा एकत्र येण्यामागे नेमकं कारण काय, असा सवाल त्यांनी कवितेतून मुंबईकरांच्या वतीने उपस्थित केला आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महापालिका निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे असून आगामी काळात या राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
Powered By Sangraha 9.0