चंद्रपूर,
farmer-kidney-chandrapur शेतकरी रोशन कुळे यांच्या किडनी विक्री प्रकरणातील आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कर्जाच्या पैश्यासाठी ज्यांचा सतत तगादा होता असा सावकार आरोपी मनिष पुरुषोत्तम घाटबांधे (42, रा. पटेल नगर, ब्रम्हपुरी), हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. अखेर त्यास बुधवारी अटक करण्यात पोलिसांना यश आले. तसेच कंबोडियात किडनी विक्रीच्या व्यवहारात सहभागी असलेल्या आरोपी हिमांशु भारद्वाज (रा. चंदीगढ, पंजाब) यास चंदीगडहून अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयासमोर उभे केले असता, 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
farmer-kidney-chandrapur सावकार मनिष घाटबांधे यास गुरूवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या दोन्ही आरोपींना अटक झाल्याच्या माहितीस जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दुजोरा दिला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील तरूण शेतकरी रोशन शिवदास कुळे यांनी सावकारी कर्जापायी आपली किडनी कंबोडियात विकली. हे प्रकरण उघडकीस येताच, तपास यंत्रणा वेगाने कार्यरत झाल्या. ब्रम्हपुरी पोलिसांनी कर्जदारांची अमानुष पद्धतीने आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक केल्याप्रकरणी 6 अवैध सावकरांविरोधात गुन्हे दाखल करून त्याच दिवशी 5 जणांना अटक केली होती. त्यातील एक आरोपी मनिष पुरुषोत्तम घाटबांधे मात्र तेव्हापासून फरार होता.
farmer-kidney-chandrapur त्यास पोलिसांनी गुरूवारी अटक केली. वैद्यकीय तपासणी करून शुक्रवारी त्यास न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, ज्याच्या माध्यमातून रोशन कुळे यांनी कंबोडियात आपली किडनी विकली तो मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेशम सुंचू (36) उर्फ ‘डॉ. क्रिष्णा’ याला विशेष पोलिस पथकाने रविवारी सोलापूर येथून अटक केली होती. तो 25 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत आहे. तपासादरम्यान या प्रकरणातील अन्य आरोपी हिमांशु भारद्वाज याला पंजाब राज्यातील चंदीगढ येथून अटक करण्यात आली आहे. आणखी एक तिसर्या आरोपीला शोधले जात आहे.