ढाका,
Journalists in Bangladesh बांगलादेशात येत्या फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले असून त्याचा थेट फटका माध्यमांवर बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सत्य मांडण्याच्या प्रयत्नांची किंमत पत्रकारांना जीवाच्या भीतीने चुकवावी लागत असून, अनेक पत्रकारांना खुलेआम जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. ढाका शहरात नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेने माध्यम स्वातंत्र्याच्या स्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. १९ डिसेंबर रोजी जमावाने बांगलादेशातील ‘प्रथम आलो’ आणि ‘द डेली स्टार’ या नामांकित वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड करत इमारतींना आग लावली, ज्यामुळे आत काम करणारे दोन डझनहून अधिक पत्रकार आणि कर्मचारी अडकून पडले. काही वेळासाठी परिस्थिती इतकी भीषण झाली की पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

या घटनेचा थरारक अनुभव सांगताना एका वरिष्ठ पत्रकाराने सांगितले की, त्या रात्री आपण जिवंत राहू की नाही याची खात्रीच नव्हती. आग लागल्यानंतर संपूर्ण इमारत दाट धुराने भरली होती आणि श्वास घेणेही कठीण झाले होते. अखेर जीव वाचवण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना छतावर जाऊन आसरा घ्यावा लागला. त्यांच्या मते, ही घटना एखाद्या क्षणिक संतापाचा परिणाम नसून पत्रकारांविरोधातील वाढत्या हिंसाचाराची सुरुवात असू शकते. अग्निशमन दल आणि लष्कराच्या जवानांनी तत्काळ कारवाई करत सुमारे २८ जणांची सुखरूप सुटका केली, ज्यामध्ये बहुसंख्य पत्रकारांचा समावेश होता. काही प्रेस स्वातंत्र्य संघटनांनी दावा केला आहे की जमाव केवळ इमारती पेटवत नव्हता, तर बचाव पथकांनाही अडवण्याचा प्रयत्न करत होता. सुदैवाने, मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान, एका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमासाठी काम करणाऱ्या पत्रकाराने बोलताना सांगितले की, पत्रकार कोणत्या विचारसरणीचे आहेत हे ठरवण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्सवर लक्ष ठेवले जात आहे. विशेषतः अल्पसंख्याक समुदायातील पत्रकार किंवा उदारमतवादी भूमिका मांडणाऱ्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आपल्या कामामुळेच शिक्षा भोगावी लागत असून, सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे अनेक पत्रकार भयभीत अवस्थेत काम करत असल्याचे वास्तव या घटनांमधून समोर येत आहे.