‘कलचुरी’ कालखंडातील मंदिराचा शिल्लक स्तंभ निखळताेय

24 Dec 2025 17:02:46
पराग मगर
 
 
नागपूर,
Kalachuri dynasty temple वाकाटक साम्राज्यानंतर उदयास आलेल्या आणि 550 पासून 1740 पर्यंत तब्बल 1200 वर्ष विविध भूभागांवर राज्य करणाऱ्या ‘कलचुरी’ साम्राज्यातील एक मंदिर माैदा तालुक्यातील सूर नदीकाठी वसलेल्या ‘वाकेश्वर’ या गावी निदर्शनास आले आहे. आजघडीला अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या या मंदिराचा केवळ गाभारा आणि काही खांब तेवढे शिल्लक असल्याची माहिती मंदिर स्थापत्यकलेचे अभ्यासक डाॅ. शेषशयन देशमुख यांनी दिली.
 
 
Kalachuri dynasty temple

जिल्ह्यात सापडलेले आजवरचे एकमेव मंदिर
दै. तरुण भारतला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डाॅ. अरविंद जामखेडकर यांनी राज्य पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय विभागाचे संचालक असताना सर्वप्रथम या मंदिराचा शाेध घेत महाराष्ट्र स्थापत्य आणि कला या गॅझेटमध्ये या मंदिराची नाेंद केली आणि वर्णन करून ठेवले. परंतु त्यांनी नाेंद घेताना भंडारा जिल्ह्यातील माेहाडी तालुक्यातील वाकेश्वर गावात हे मंदिर असल्याचे लिहून ठेवले. डाॅ. देशमुख सांगतात, मी अनेकवेळा माेहाडी तालुक्याला भेट देत हे मंदिर शाेधण्याचा प्रयत्न केला परंतु ते कधीच सापडले नाही. त्यामुळे डाॅ. देशमुख यांनी दुसरा मार्ग अवलंबत जिल्ह्यातील वाकेश्वर या नावांची गावे शाेधली असता एक गाव माैदा तालुक्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी येथील वाकेश्वर गावाला भेट दिली असता प्रथमतः येथील ग्रामस्थांनीही असे कुठले मंदिर नसल्याचे सांगितले. परंतु डाॅ. देशमुख यांनी जिद्द न साेडता गाव पिंजून काढले असता एका महिलेने त्यांना एक प्राचीन मंदिराचा काही भाग गावात शिल्लक असल्याचे सांगितले. हेच ते कलचुरी काळातील मंदिर अनेक वर्षांनी आज दृष्टीपथास आले. या शाेधामुळे जिल्ह्यात सापडलेले हे पहिले कलचुरी कालीन मंदिर असल्याची माहिती डाॅ. देशमुख यांनी दिली.
 
 
मंदिराची रचना कलचुरी वंशातील
 
 
या मंदिराची रचना Kalachuri dynasty temple कलचुरी वंशाची असल्याचे मंदिर स्थापत्याचे अभ्यासक असलेले डाॅ. देशमुख सांगतात. हा वंश शिवाचा भक्त हाेता आणि नदीकिनारी मंदिरे बांधली जात हाेती. या गावातूनही सूर नदी वाहते आणि जेव्हा हे गाव नसेल तेव्हा या मंदिरापासून नदी थेट दिसत असावी अशी शक्यता आहे. तसेच हे शिवमंदिर असावे अशी शक्यता डाॅ. देशमुख यांनी व्यक्त करीत येथे शिवलिंग मात्र आज अस्तित्वात नसल्याचे सांगितले. तसेच मंदिराचा घुमटही आज शिल्लक नाही.
 
 
 
मंदिराभाेवती प्रचंड अतिक्रमण
या मंदिराच्या गाभाèयाचा काहीच भाग आज शिल्लक असून आजुबाजूला प्रचंड अतिक्रमण नागरिकांनी केले आहे. काहींनी भंगार साहित्य ठेवण्यासाठीही या मंदिराचा उपयाेग केला आहे. तसेच सप्तमातृका देवीच्या मूर्तीची येथे स्थापित केली आहे.
 
 
मंदिर परिसरात उत्खनन हाेण्याची गरज
डाॅ. देशमुख यांनी येथील सरपंचाशी संवाद साधला असता मंदिराची जागा गावमंदिर म्हणून सातबाèयात नाेंद असल्याचे सांगितले. मंदिराच्या आतील भागातही भराव देण्यात आला आहे. या मंदिर सभाेवताल परिसराचे उत्थनन केल्यास मंदिराचे अवशेष आणि शीलालेखही मिळू शकताे आणि त्यातून या मंदिराचा इतिहास कळू शकताे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
 

कलचुरी साम्राज्याविषयी
मराठी विश्वकाेशात दिलेल्या माहितीनुसार कलचुरी हा प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध वंश असून ताे उत्तर किंवा दक्षिण भारतातील काेणत्या ना काेणत्या प्रदेशावर 550 पासून 1740 पर्यंत, म्हणजे जवळजवळ बाराशे वर्षे हा वंश राज्य करीत हाेता. त्यांच्या काेरीव लेखांवरून ह्या वंशाची बरीच माहिती ज्ञात हाेते. त्यांत या वंशाचे नाव कटच्चुरी, कटचुरि, कलचुरी, कालच्चुरि, कलतुर्य, कळचुर्य इ. प्रकारांनी येते. पूर्वकालीन कलचुरी 550 च्या सुमारास वाकाटकांनंतर उदयास आले. त्यांचा मूळपुरुष कृष्णराज (सु. 550-575) याने माहिष्मती (मध्य भारतातील महेश्वर) येथे आपली राजधानी करून आपली सत्ता मध्य भारत, गुजरात, काेकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ यांवर प्रस्थापित केली.
Powered By Sangraha 9.0