एमपीएससी परीक्षेत वयोमर्यादेत सवलतीची शक्यता

24 Dec 2025 18:50:56
नागपूर,
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब) २०२५ साठी जाहिरात जुलैच्या शेवटी प्रसिद्ध झाली असून, एकूण ६७४  पदांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांसाठी ३९२ पदांचा समावेश आहे. मात्र, या वर्षी परीक्षा आणि जाहिरात वेळापत्रकात झालेल्या बदलांमुळे अनेक विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
 

MPSC 
सामान्यतः एमपीएससीची जाहिरात डिसेंबर-जानेवारी दरम्यान प्रसिद्ध होते आणि परीक्षा मार्च-मे महिन्यात घेतली जाते. परंतु, यावर्षी जाहिरात २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झाली असून परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. त्याचबरोबर, वयोमर्यादा मोजण्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या ३-४ वर्षांपासून तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचे वय १-२ महिन्यांनी अधिक झाले असून, ते आपोआप परीक्षा देण्यास अपात्र ठरत आहेत.
विद्यार्थ्यांच्या या MPSC समस्येवर लक्ष देत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वयोमर्यादेत एकवेळची सवलत देण्याची मागणी केली आहे. त्यांनी आयोगाच्या अध्यक्षांकडे बैठकीसाठी वेळ मागितला असून, सामान्य प्रशासन विभागालाही पत्र पाठवले आहे. चाकणकर यांच्या पत्रानंतर या प्रकरणावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.पूर्वी २०२२-२५ दरम्यान पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादेत अडथळा येणाऱ्या उमेदवारांना राज्य शासनाने एकवेळची विशेष संधी दिली होती. त्याच धर्तीवर आता एमपीएससी संयुक्त गट-ब, विशेषतः पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी देखील अशा विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी विविध लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनांमध्ये केली आहे.
 
 
राष्ट्रवादी काँग्रेस MPSC पक्षाचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही ट्विटरच्या माध्यमातून या मुद्यावर चिंता व्यक्त केली आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांनीही विविध समाज माध्यमांतून ‘अराजपत्रीत संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ साठी किमान एक वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.सदर बदल मंजूर झाल्यास, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना आपल्या पात्रतेनुसार परीक्षा देण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. आयोग आणि सरकारकडून यावर लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
Powered By Sangraha 9.0