नववर्षी वैष्णोदेवी यात्रेसाठी नवे नियम; RFID कार्ड अनिवार्य, वेळमर्यादा लागू

24 Dec 2025 10:19:06
नवी दिल्ली,
New rules for the Vaishno Devi नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर श्री माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचे प्रवास नियम लागू करण्यात आले असून यात्रेकरूंनी त्याची विशेष दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने तात्काळ प्रभावाने नवे आदेश जारी केले असून, यामध्ये प्रवास सुरू करण्याची आणि पूर्ण करण्याची ठरावीक वेळ निश्चित करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार, माता वैष्णोदेवी यात्रेसाठी नोंदणी केलेल्या प्रत्येक भाविकाला RFID प्रवास कार्ड बाळगणे अनिवार्य असेल. हे कार्ड मिळाल्यानंतर भाविकांना १२ तासांच्या आत प्रवास सुरू करावा लागेल, तसेच २४ तासांच्या आत कटरा येथील बेस कॅम्पमध्ये परतणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी, प्रवास सुरू करण्यासाठी कार्डची वैधता मर्यादित होती, मात्र प्रवास पूर्ण करण्यासाठी कोणतीही वेळमर्यादा नव्हती. आता प्रथमच दर्शन पूर्ण करण्यासाठीही ठोस वेळमर्यादा लागू करण्यात आली आहे.
 
 
 
vaishno devi
श्राइन बोर्ड प्रशासनाच्या माहितीनुसार, नवीन वर्ष जवळ येत असल्याने भाविकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः वर्षअखेरीस येणाऱ्या तीन ते चार दिवसांत यात्रेकरूंची मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत. मंदिर परिसरात आणि मार्गावर गर्दी, गोंधळ किंवा चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या नव्या नियमांची अंमलबजावणी सर्व प्रकारच्या प्रवासासाठी करण्यात येणार असून पायी, हेलिकॉप्टर, बॅटरी कार तसेच इतर पर्यायी मार्गांनी प्रवास करणाऱ्या भाविकांनाही हे नियम तितकेच लागू असतील. यात्रा नोंदणी केंद्रांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या आदेशांची सतत माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. दरम्यान, भाविकांच्या सोयीसाठी कटरा रेल्वे स्थानकाजवळील यात्रा नोंदणी केंद्राची वेळ वाढवण्यात आली आहे. आता येथे मध्यरात्री १२ वाजेपर्यंत RFID कार्ड उपलब्ध असणार असून, यापूर्वी ही सुविधा रात्री १० वाजेपर्यंत मर्यादित होती. तसेच रात्री उशिरा रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन देवरी प्रवेशद्वारावर २४ तास RFID कार्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने यात्रेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत श्राइन बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यात्रा व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे निर्देश दिले. RFID आधारित प्रवेश नियंत्रण अधिक कडक करण्यावर भर देण्यात आला असून, वैध RFID कार्ड असलेल्या भाविकांनाच पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल, याची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरक्षा यंत्रणांनीही बैठकीत बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली. या व्यवस्थेमध्ये पोलीस, सीआरपीएफ आणि श्राइन बोर्डचे सुरक्षा कर्मचारी तैनात असणार असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी जलद प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. संभाव्य धोक्यांचा तात्काळ अंदाज घेण्यासाठी आधुनिक देखरेख यंत्रणांचाही वापर करण्यात येणार आहे. कटरा ते माता वैष्णोदेवी मंदिराचे अंतर सुमारे १३ किलोमीटर असून भाविक पायी, घोडा, खेचर, बॅटरी कार किंवा हेलिकॉप्टरद्वारे दर्शनासाठी जातात. पायी प्रवास साधारणतः आठ तासांचा असतो, तर सर्वसाधारणपणे संपूर्ण यात्रेला २४ ते ३६ तासांचा कालावधी लागतो. नव्या नियमांमुळे ही यात्रा अधिक सुरक्षित, नियोजित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास श्राइन बोर्डाने व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0