कारंजा लाड,
Karanja municipal election नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत निकालाइतकीच एक बाब प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे ‘नोटा’ या पर्यायाचा वाढता वापर. तब्बल १६३३ मतदारांनी नोटाचा वापर करीत, उपलब्ध उमेदवारांपैकी कोणावरही विश्वास नसल्याचा स्पष्ट संदेश दिला. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये सर्वाधिक नोटाचा वापर झाल्याने या प्रभागाची चर्चा निकालानंतरही थांबलेली नाही. एकूण ७० हजार ३३१ मतदारांपैकी ४३ हजार ७०१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही मतदानाची टक्केवारी लोकशाहीसाठी सकारात्मक मानली जात असली तरी नोटाकडे वळलेली मोठी संख्या ही आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करणारी आहे.
यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी १२ उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी १२७ उमेदवार असे एकूण १३९ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात असतानाही मतदारांचा एक वर्ग कोणताही उमेदवार स्वीकारार्ह नाही’ अशी भूमिका घेत असल्याचे चित्र दिसून आले. नोटाचा वापर म्हणजे मतदानापासून दूर राहणे नव्हे, तर लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत नाराजी नोंदवणे होय. ही नाराजी केवळ उमेदवारांपुरती मर्यादित नसून, राजकीय पक्षांची उमेदवार निवड प्रक्रिया, स्थानिक प्रश्नाबाबतची उदासीनता आणि विश्वासार्ह नेतृत्वाचा अभाव याकडेही बोट दाखवणारी आहे. विशेषतः प्रभाग १३ अ. मधील नोटाचा वाढलेला वापर हा तेथील सामाजिक, राजकीय समीकरणांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे.त्यामुळे हा कौल दुर्लक्षित करता येणार नाही. या निवडणुकीतून विजयी उमेदवारांनी केवळ विजयाचा आनंद साजरा न करता, नोटा वापरणार्या मतदारांचा रोष आणि अपेक्षा समजून घेणे गरजेचे आहे. लोकशाही टिकवायची असेल, तर मतदारांचा विश्वास पुन्हा संपादन करणे हीच खरी कसोटी ठरणार आहे.कारंजा शहरातील हा ‘नोटा संदेश’ भविष्यातील राजकारणासाठी एक गंभीर इशारा मानावा लागेल.