मुंबई,
Raj Thackeray's emotional appeal मुंबईत ठाकरे बंधूंच्या बहुप्रतिक्षित युतीची अखेर अधिकृत घोषणा झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या क्षणाकडे खिळलं. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. व्यासपीठावर उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि संजय राऊत एकत्र दिसत होते. कार्यक्रमाच्या शेवटी नेहमीप्रमाणे थेट आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जाणारे राज ठाकरे यांनी मात्र एका छोट्याशा वाक्यात संपूर्ण सभागृह भावनिक केलं. सर्व औपचारिक घोषणा, युतीबाबतचे मुद्दे आणि माध्यमांच्या प्रश्नोत्तरानंतर राज ठाकरे यांनी माईक हाती घेतला आणि निघताना “माझी फक्त एकच विनंती आहे. ज्यांचं मुंबईवर, महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर प्रेम आहे, अशा सर्वांनी आमच्या पाठीशी उभं राहावं, अशी भावनिक साद घातली. राज ठाकरेंच्या या शब्दांनी उपस्थित कार्यकर्ते, पत्रकार आणि सामान्य नागरिकांवरही खोल परिणाम केला.
या भावनिक क्षणाआधी राज ठाकरे यांनी आपल्या शैलीतच युतीची घोषणा केली होती. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली आहे, असे एकाच वाक्यात त्यांनी स्पष्ट केलं आणि गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या आपल्या जुन्या भूमिकेची आठवण करून देत, तिथूनच दोन्ही पक्ष एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं.
युतीची घोषणा करतानाच राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित करत मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा निर्धार व्यक्त केला. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका व्हिडीओचा उल्लेख करत कोपरखळीही मारली. मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ फिरतोय, जिथे ते ‘अल्लाह हाफीज’ म्हणत आहेत. माझ्याकडेही बरेच व्हिडीओ आहेत, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला. एकीकडे ठाकरे बंधूंची युती आणि मराठी मुद्द्यावरचा निर्धार, तर दुसरीकडे राज ठाकरेंची भावनिक साद आणि थेट शैली, यामुळे ही पत्रकार परिषद केवळ राजकीयच नाही तर भावनिकदृष्ट्याही लक्षवेधी ठरली.