मुंबई,
Raj Thackeray's style मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा आज मुंबईत होणार असून त्यासाठी वरळीतील हॉटेल ब्लू सी येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या घोषणेपूर्वी सकाळी एक घडामोड विशेष चर्चेत आली. पत्रकार परिषदेसाठी निघण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे थेट राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी पोहोचले. काही काळ बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर दोघेही एकाच कारमधून वरळीच्या दिशेने रवाना झाले. गाडीमध्ये मागील सीटवर चालकाच्या मागे उद्धव ठाकरे बसले होते, तर त्यांच्या शेजारी राज ठाकरे होते. ठाकरे बंधूंना एकत्र पाहताच शिवतीर्थ परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आणि गाडी पुढे नेण्यासाठी पोलीस व सुरक्षारक्षकांना मोठी धावपळ करावी लागली.

याच गर्दीतून पुढे जात असताना एक खास आणि अनपेक्षित क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. राज ठाकरे बसलेल्या बाजूला एक कार्यकर्ता आपल्या लहान मुलीला कडेवर घेऊन गाडीच्या जवळ आला. त्या चिमुकलीने कारच्या काचेला हात लावत राज ठाकरेंना ‘हाय’ केलं. हे पाहताच राज ठाकरेंनी गाडीची काच खाली केली. मुलीने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला असता, राज ठाकरेंनी हात मिळवण्याऐवजी जनरेशन झेड स्टाइलमध्ये दोन्ही हातांनी हार्ट शेप तयार करत तिला प्रतिसाद दिला. राज ठाकरेंचा हा अनोखा आणि आपुलकीचा क्षण क्षणार्धात सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
दरम्यान, पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करणार असल्याची माहिती आहे. या परिषदेत दोघे नेते युतीची औपचारिक घोषणा करताना जागावाटपाबाबतही भूमिका स्पष्ट करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मुंबईत काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून, यावर ठाकरे बंधू काही प्रतिक्रिया देतात का, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.