वेध...
विजय निचकवडे
global school नावात काय ठेवलंय? असं म्हणतात, पण नावात बरंच काही दडलेलं असते. म्हणून तर काहीही नसताना मोठमोठाली ‘वजनदार’ शब्द लिहून भुरळ घालण्याचा प्रयत्न होतो. आता गावागावांत जिथे आरोग्याच्या चांगल्या सोयी नसतील, पण तेथे नावात ‘इंटरनॅशनल’ लिहिलेली शाळा असते आणि इंटरनॅशनलची मोहिनी अनेकांना पडते. पण आता नावातील हा इंटरनॅशनल, ग्लोबलपणा काढून टाकण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्याने कदाचित याकडे सकारात्मक बदल म्हणून पाहिले जाऊ शकते. शिक्षण संस्थांचे पीक आले आहे. मग अगदी खेड्यातही मोठमोठाल्या शाळा उभ्या झाल्यात. मोठा तामझाम आणि आकर्षक असे नाव असलेल्या शाळा पालक, विद्यार्थ्यांना संमोहित करतात आणि अनेक शाळांचा ‘व्यवसाय’ सुरू होतो. आम्हाला शाळांच्या नावामध्ये असलेले ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘सीबीएसई’ असे शब्द दिसतात. त्याच्या खोलात आम्ही कधीच जात नाही. मात्र, राज्याच्या शिक्षण संचालनालयाने काढलेल्या एका पत्राने अशा शब्दांचा वापर करून शाळांचे दुकान थाटलेल्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे. अनेक शाळा या राज्य मंडळाशी संलग्नित असतात.
त्या शाळांच्या नावात मोठमोठाल्या शब्दांचा वापर होतो. इंटरनॅशनल, ग्लोबल, इंग्लिश मीडियम स्कूल असे लिहिलेले पाहून पालक आपसूकच शाळांकडे वळतात. मात्र या शाळांना अशा शब्दांचा वापर करण्याचा अधिकार नाही, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळांची मान्यता मराठी माध्यमाची असताना इंग्रजी शब्दाचा वापर करून पालक, विद्यार्थी आणि शासनाची एकप्रकारे फसवणूक करण्याचा प्रकार या माध्यमातून केला जात असल्याचा निष्कर्ष पुढे आला आणि विषय चर्चेत आला. अशा नावांचा वापर करताना एक तर शाळेची परदेशात शाखा असणे किंवा शाळेची संलग्नता आंतरराष्ट्रीय स्तराच्या मंडळाशी असणे गरजेचे आहे. खरंच, आज किती शाळा या गोष्टी पाळतात. संस्थेची एकही शाळा असेल तरी ती इंटरनॅशनल असते, हे विशेष!
राज्य प्राधिकरणाकडे शाळांची मान्यता घेताना किंवा नाव बदलण्यासाठी प्रस्ताव टाकताना आता या गोष्टींची खातरजमा केली जाणार आहे. शिक्षण संचालनालयाच्या पत्राने आता शिक्षणाधिकाऱ्यांनाही अशा शाळांना ‘वजनदार’ नावांची चूक लक्षात आणून देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळा चालविताना किती नियम पाळले जातात, हा प्रश्नच आहे. कदाचित या गोष्टींची जाणीव संस्था चालकांनाही असावी; मात्र वेगळेपण दाखविण्याच्या आणि पालक-विद्यार्थ्यांची गर्दी खेचण्याच्या नादात या सर्व चुकीच्या गोष्टी त्यांच्यासाठी प्रमाण असतात. मराठी माध्यमाची मान्यता आणि नावात इंग्रजीचा पसारा अशी अवस्था आज जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र शाळांची झाली आहे. संस्था चालकांचा जेवढा कसूर आहे; कदाचित अधिक आमचा असावा. कारण आम्हीही नाव पाहून आमची पाऊले शाळेकडे वळवितो. मोठमोठाली नावे पाहून आपल्या मुलाने त्याच शाळेत शिकावे, असा आग्रह आमचा असतो. कधी त्या नावाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न करीत नाही. तेव्हा खèया अर्थाने आम्ही फसवणुकीत आनंद मानत असतो.
आज इंग्रजी शाळा, इंग्रजी वलय असलेल्या नावांचे मागे धावत असताना मराठी शाळा मात्र ओस पडत आहेत. खरे तर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये नवीन शिक्षकांमध्ये असलेली प्रतिभा इंग्रजी शाळांमध्येही मिळणार नाही. पण आमच्या शाळांचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळा असते आणि तेच आम्हाला भावत नाही, ही व्यथा आहे. आज ज्यांना जे करण्याचा अधिकार नाही, ते करून पालक आणि शासनाची फसवणूक होत असतानाही आम्ही नावाच्या मोहात पडतो आहे. अशावेळी शिक्षण विभागाने घेतलेली भूमिका नक्कीच सकारात्मक म्हणावी लागेल.global school आता गावात असलेली इंटरनॅशनल स्कूल ‘राष्ट्रीय’ शाळा होईल आणि खरे वास्तव लोकांपुढे येईल, अशी अपेक्षा करण्यास हरकत काय? आणि यानंतरच ‘नावात काय ठेवलंय’ म्हणणाऱ्यांना नावातच सर्वकाही दडलंय, याची जाणीव होईल.
9763713417
....