varaha purana परमेश्वराचा वराह अवतार ज्या पुराणात कथन केला ते पुराण म्हणजे वराह पुराण. अवताराचीही विकासात्मक उकल पाहिली पाहिजे.
पहिला मत्स्य अवतार जो जलचर आहे.
दुसरा कूर्म अवतार जो उभयचर आहे.
तर तिसरा वराह अवतार भूचर अवतार आहे.
व्यासांनी रचलेल्या वराह पुराणात वराह अवताराचे प्रयोजन आहे. या पुराणात त्याची सुंदर कथा आहे. एकदा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार भगवान नारायण विष्णूंच्या दर्शनासाठी गेले असता तिथे द्वारपाल असलेल्या जय आणि विजय यांनी त्यांना अडवले, त्यांच्याशी उन्मत्तपणा केला. त्यामुळे रागावून सनतकुमारांनी जय आणि विजय यांना शाप दिला की तुम्ही असुरांसारखे वागलात म्हणून राक्षस व्हाल. त्या शापाच्या योगाने जय-विजय दितीच्या पोटी दैत्य म्हणून जन्माला आले. जय हिरण्याक्ष तर विजय हिरण्यकश्यपू झाले.

हिरण्याक्ष दैत्याने कठोर तप करून सामर्थ्य मिळवले. त्या प्रभावाने त्याने संपूर्ण पृथ्वीवर आपल्या सामर्थ्य आणि बळाने ताबा मिळवला. त्याच्या अन्याय आणि अत्याचाराने सर्वत्र त्राही मां अवस्था झाली. पृथ्वीला त्याने पार पाताळात नेले. रसातळाला गेलेली पृथ्वी तिने स्वत:ला वाचविण्यासाठी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. देवता एकत्रित झाल्या आणि सर्वांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली. प्रार्थनेचा परिणाम म्हणून ब्रह्मदेवाच्या नासिकेतून एक सूक्ष्म वराह बाहेर पडला आणि पाहता पाहता तो अनुपासोनी ब्रह्मांडाएव्हढा झाला. हा वराह म्हणजे साक्षात विष्णू होते. त्यांनी सर्वांना दिलासा दिला. वराह भगवंतांनी पाताळात जाऊन हिरण्याक्ष दैत्याचा वध केला. आणि आपल्या प्रचंड अशा दात सुळ्यांवर पृथ्वीमातेला ठेवून तिला मुक्त केले. सृष्टीचे रक्षण आणि धर्माची पुनर्स्थापना केली. अशी या वराह पुराणाची संक्षेपात कथा आहे.
हे वराह पुराण प्रत्यक्ष वराह भगवंतांनी श्रीमाता पृथ्वीला सांगून उपदेश देखील दिला आहे. या पुराणाची सुरुवातच पृथ्वी-वराह संवादाने आहे. थोडक्यात वराह पुराण हे वराहनारायण आणि भूमाता पृथ्वी यांचा संवाद आहे. 24000 श्लोकसंख्या असलेल्या या पुराणात एकूण 217 विषय आहेत. या पुराणात देवर्षी नारदांना वेदमाता श्रीसावित्रीचे अद्भुत दर्शन, महामुनी कपिल यांनी राजा अश्वशिरा यांना दाखविलेले भगवंताचे सर्वव्यापक स्वरूप, रैभ्यमुनी आणि बृहस्पती संवाद तथा रैभ्य आणि सनतकुमार संवाद आहे. या संवादात भगवंताचे स्वरूप, त्याचे वंदन, वंदनाचे जीवनावर परिणाम आणि मोक्षप्राप्तीचे साधन यावर चर्चा आहे.
या पुराणात गयेला केलेल्या पिंडदानाचे महत्त्त्व, श्राद्ध, श्राद्धकल्प महत्त्व विशद केले आहे. अश्विनीकुमार उत्पत्ती, गौरी उत्पत्ती, गणेश उत्पत्ती, सर्प उत्पत्ती, कार्तिकेय, आदित्य, दुर्ग उत्पत्ती दिली आहे. त्या अनुषंगाने त्यांचे माहात्म्य विदित आहे. सर्व अवतारांचे द्वादशी व्रत जसे मत्स्य द्वादशी व्रत, कल्की द्वादशी व्रत, बुद्ध द्वादशी व्रत, श्रीराम द्वादशी व्रत इत्यादी व्रत याच पुराणात विदित आहेत.
याशिवाय धरणी व्रत, धन्य व्रत, कांती व्रत, सौभाग्य व्रत, अविघ्न व्रत, शांति व्रत, काम व्रत, साधन व्रत, आरोग्य व्रत, शौर्य व्रत, सार्वभौम व्रत देखील सांगितले आहेत. त्याची तंत्र मंत्र साधना आणि फळ श्रुती आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग या चारही युगाचे गुणधर्म या पुराणात विदित आहेत. सुमेरू पर्वत, सुमेरू पर्वतावरील विविध नद्या, विविध जलाशयांचे वर्णन इथे आहे.
भारतवर्षाच्या नऊ खंडांचे वर्णन अभ्यासाचा विषय ठरतो. कसेरु, ताम्रवर्ण, गभास्तिमान, नाग, सौम्य, गंधर्व, वारूण, भारत खंड असे ते खंड आहेत. यावरून अखंड भारताचे चित्रण करता येते. भूमीला सप्तद्वीप वसुंधरा म्हणतात. ते सप्तद्वीप या पुराणात सांगितले आहेत. जंबू द्वीप, शाक द्वीप, कुश द्वीप, क्रौंच द्वीप, शाल्मली द्वीप, गोमेद द्वीप आणि पुष्कर द्वीप ही त्यांची नावेही दिली आहेत. त्यावरून ‘वसुधैव कुटुंबकम्’ची संकल्पना दिसून येते.
विविध प्रकारचे दान या पुराणात सांगितले आहेत. त्यात विविध प्रकारच्या धेनूदान सांगितल्या आहेत. जसे तिलधेनू, जलधेनू, रसधेनू, गुड धेनू, शर्करा धेनू अशा विविध तेरा धेनू दान आहेत. कळत-नकळत होणारी 32 प्रकारची पातके, महापातके सांगितली आहेत. त्याचे प्रायश्चित्त, साधना, उपाय देखील दिले आहेत. यमलोकांचे वर्णन याच पुराणात दिले आहे. यम नचिकेता याबाबतही विशेष दिले आहे. भगवंताने अवतारासाठी वराह रूप का निवडले असेल? वराह तर तशा अर्थांनी निषिद्ध प्राणी.
वराहाची काही वैशिष्ट्ये आहेत. एक तर वराह दलदलीत जाऊ शकणारा, लढाऊ आणि शक्तिशाली प्राणी. त्याचे सुळे त्याचे बलाढ्य शस्त्र आहे. पृथ्वीला हिरण्याक्ष दैत्याने पाताळात नेल्यामुळे तेथील दलदलित जाणे आवश्यक होते. याशिवाय वराहास आपल्या सुळ्यांचा वापर करून दैत्यवध करण्यास सहजता होती.
रसातलगतां भूमिं गजः कमलिनीमिव । उद्दधार हि तं विष्णुं वन्दे वाराहरूपिणम्
ज्याप्रमाणे हत्ती कमळाला आपल्या सोंडेने सहज उपसतो तद्वतच वराह विष्णूंनी आपल्या पुष्ट सुळ्यांनी पृथ्वीला उचलले. त्याचे बाहू देखील मजबूत आहेत. वराहाचे ध्येय सरळ असते. त्याची धडक ही आजूबाजूला न वळता सरळमार्गी असते.
चकास्ति शृङ्गोढघनेन भूयसा कुलाचलेन्द्रस्य यथैव विभ्रमः
सुळ्यामुळे दलदलीत फसलेल्या पृथ्वीला सहज उपसून सुळ्यावर ठेवून वर आणणे त्यामुळे शक्य होते. ज्याप्रमाणे एखाद्या पर्वतावर मेघ असावेत तसे सुशोभायमान स्वरूप दातांवर पृथ्वी घेतलेल्या वराह विष्णूंचे आहे.
भगवंताने सृष्टीचे रक्षण आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी वराह अवतार धारण केला.varaha purana भगवान वराह आणि भूमाता पृथ्वी यांचा संवाद म्हणजे वराह पुराण. त्यातील मथितार्थ पुढील श्लोकात भगवान वराह स्पष्ट करतात.
यस्यातद् विदितं सर्वं न्यासयोगं वसुंधरे
योगे न्यस्य सदात्मानं मुच्यते न च संशयः
हे वसुंधरे! न्यासयोग म्हणजे सर्वस्व मला अर्पण करून कर्म करतो तो निःसंदेह मोक्षास प्राप्त होतो.
विद्यावाचस्पती प्रा.दिलीप जोशी, वाशीम.
9822262735